‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही प्रशासनावर जोरदार टीका केली.

 

पुष्करने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून मुंबईतील खड्डयांवर टीका केली आहे. मुंबईतील इतर भागांत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोरील रस्ता कसा गुळगुळीत आहे? असा सवाल पुष्करने विचारला आहे.
१५ सप्टेंबरच्या रात्री साडे आठ वाजता पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला त्याला सव्वा तीन तास लागले. तर अभिनेता अनिकेत विश्वासराव याला सव्वा चार तास लागले. हे सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचे त्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

पुष्कर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या भीषण परिस्थितीवर जोरदार टीकाही केली. मंत्रालय, पालिका मुख्यालय, वर्षा बांगला इथले रस्ते कधीच कसे खराब होत नाहीत मग आमच्याच घराजवळचे रस्ते कसे खराब होतात, याचाच अर्थ त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. रस्ते बांधणीतला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेच, पण एकदाच काय खायचे ते पैसे खा पण चांगले रस्ते तेवढे बनवून द्या, अशी कडवट टीकाही त्याने या व्हिडीओ द्वारे केली आहे.