बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या त्याच्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे बराच चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या होत्या. राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर त्याची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

राज कुंद्रा याने २०१३ साली ही मुलाखत दिली होती. त्यापूर्वी काही दिवसाआधीच राज आणि शिल्पाने मुलगा वियानला जन्म दिला होता. “मला गरिबीचा खूप तिरस्कार आहे” असं या मुलाखतीत बोलताना राज कुंद्रा म्हणाला होता. कोट्यावधींचा कारभार सांभाळणाऱ्या राज कुंद्राने त्याच्या व्यवसायाची सुरूवात २००० यूरो पासून केली होती. राज कुंद्रा याचा जन्म लंडन इथल्या एका सामान्य कुटुंबात झाला होता. एक काळ असा होता की राज कुंद्राचे वडील एक बस कंडक्टर होते आणि आई एका कारखान्यात काम करत होत्या. त्याचे वडील लुधियानाहून लंडनमध्ये स्थायिक झाले होते. सुरूवातीला राजच्या वडिलांनी एका कॉटन कारखान्यात काम केलं आणि त्यानंतर ते बस कंडक्टर म्हणून काम करू लागले.

राज कुंद्रा याच्या वडिलांनी जेव्हा एक किराणा दुकान सुरू केलं, त्यानंतर राजच्या घरची आर्थिक परिस्थिती बदलू लागली. त्यावेळी राजच्या वडिलांनी त्याला चेतावनी दिली होती. ६ महिन्यांचा वेळ देत काही तरी करून दाखव नाहीतर आमच्यासोबत काम कर, असं राज कुंद्राला वडिलांनी सांगितलं होतं. यासाठी राजच्या वडिलांनी त्याला २००० यूरो सुद्धा दिले होते. त्यानंतर राज कुंद्रा दुबईत गेला. तिथे जाऊन काही व्यापाऱ्यांसोबत त्याने बातचीत केली. पण तिथे हवा तसा प्रतिसाद त्याला मिळाला नाही.

शॉल विकून सुरू केला व्यवसाय

त्यानंतर तो दुबईवरून नेपाळमध्ये गेला. तिथे त्याने पश्मीना शॉल पाहिली होती. नेपाळमध्ये या शॉलची किंमत देखील मोठी होती. राजने यावर विचार केला आणि तिथून १०० शॉल खरेदी करून तो पुन्हा लंडनमध्ये आला. त्यानंतर त्याने इंग्लंडमधल्या मोठ-मोठ्या क्लोथिंग ब्रॅंडसोबत बातचीत सुरू केली.

 

२० मिलियन इतका झाला टर्नओव्हर

बघता बघता राज कुंद्रा श्रीमंत बनला आणि त्याचं वर्षाचं टर्नओव्हर जवळपास २० मिलियन यूरोज इतकं झालं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आता राज कुंद्रा कोट्यावधींमध्ये कमाई करतोय. २००९ मध्ये एका कंपनीच्या मदतीने राजस्थान रॉयल्सचा मालक बनला.

या मुलाखतीत बोलताना राज कुंद्रा म्हणाला होता, ” १८ वर्षाचा असताना त्याने कॉलेज सोडलं आणि तेव्हापासून एक सेल्फ मेड मॅन बनला. ज्या ज्यावेळी शिल्पा त्याला व्यर्थ खर्च टाळण्यासाठी बोलत असायची त्यावेळी तो शिल्पाला म्हणालायचा की मी कमवलेले पैसे खर्च करण्यात मला कोणती चिंता नाही वाटत.”

यापुढे बोलताना राज कुंद्रा म्हणाला होता, “माझ्या क्रोधाने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे…मला गरिबीचा इतका तिरस्कार होता की पुढे जाऊन श्रीमंत बनण्यासाठीचाच विचार करत आलो आणि मी माझ्या जीवनात बदल घडवून आणले. मी एक सेल्फ मेड मॅन आहे म्हणून शिल्पा माझी खूप इज्जत करते” असं देखील या मुलाखतीत राज कुंद्राने म्हटलंय.