लॉकडाउनच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनीने ८० आणि ९०च्या दशकाताली सर्व मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या मालिकांमधील रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जणूकाही जादूच केली होती. ‘रामायण’ मालिकेनंतर ‘उत्तर रामायण’ ही मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. पण ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित न होता स्टारप्लस वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

‘रामायण’ ही मालिका स्टारप्लस वाहिनीवर पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे. याची माहिती स्टारप्लस वाहिनीने ट्विटरद्वारे दिली आहे. ‘४ मे पासून रामायण ही मालिका सोमवार ते रविवार दररोज ७ वाजून ३० मिनिटांनी स्टारप्लस वाहिनीवर प्रदर्शित होत आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘रामायण’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.

रामानंद सागर यांची रामायण ही मालिका ८०च्या दशकातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका पुन्हा प्रदर्शित केल्यामुळे प्रेक्षकवर्ग आनंद व्यक्त करत आहे. तसेच मालिका प्रदर्शित होताच मालिकेतील कलाकारदेखील पुन्हा एकदा चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेने विश्वविक्रम केल्याचे समोर आले होते. या मालिकेने एका दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळवले होते. प्रसारभारतीच्या ट्विटर पेजवर पोस्ट करत रामायण या मालिकेला १ दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळाल्याची माहिती देण्यात आली होती.

रामायण मालिकेनंतर रामानंद सागर यांची उत्तर रामायण म्हणून ओळखली जाणारी मालिका लव कूश प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. पण या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर रामनंद सागर यांची ‘श्री कृष्ण’ ही मालिका प्रदर्शित करण्यात आली.