पुणे : गावखेड्यातला मुलगा असल्याने मी घरच्या शेळ्या-बकऱ्या चारायला न्यायचो. शेळ्या पांगल्यावर त्यांची आई जसा आवाज काढून त्यांना बोलावते, तसे आवाज काढायला मी शिकलो. हळूहळू कावळ्यांनीही माझे लक्ष वेधून घेतले. कावळे आपसांत ज्या ज्या आवाजात संवाद साधतात, ते ध्वनी मी हुबेहूब काढू लागलो आणि मी काढलेल्या त्यांच्या आवाजाला कावळे लगेच प्रतिसाद देऊ लागले.

एका दहाव्याच्या विधीला काही केल्या पिंडाकडे कावळा फिरकत नव्हता. तेव्हा आपण कावळ्याचा आवाज काढला, तर कावळा येईल या कल्पनेतून मग मी प्रथमच कावळ्याचा आवाज काढला. लगेच कावळे येऊ लागले आणि पिंडाला कावळा शिवण्याचा प्रश्न निकाली निघाला. मी कावळ्यांना बोलावू शकतो, अशी माझी ख्याती आसपास पसरली आणि मला कावळ्यांच्या ‘सुपाऱ्या’ येऊ लागल्या. कावळे माझ्या सुरुवातीच्या अर्थार्जनाचे साधन बनले,’ हा किस्सा बर्डमॅन सुमेध यांनी आपल्या कथनातून उलगडताच हास्यकल्लोळ झाला.

झपाट्याने कमी होत असलेल्या जंगलांचे व वन्यप्राणी संवर्धनाचे महत्त्व मुलांना योग्य वेळी कळावे, या दृष्टीने जंगल बेल्स, ‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘बोगनवेल फार्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाइल्डलाइफ फेस्टिव्हल फॉर किड्स’ या विशेष कार्यक्रमात बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी संवाद साधला. पुणे वन विभागाचे सहकार्य लाभलेल्या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, तसेच संजीवनी डेव्हलपर्सचे संजय देशपांडे, मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते.

दोनशेहून अधिक पक्षी व प्राणी यांचा हुबेहूब आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबाचे बर्डमॅन सुमेध वाघमारे यांचे ताडोबा जंगलातील अनुभव कथन केले. जंगलात आढळणाऱ्या विविध पशू-पक्ष्यांचा आवाज तर त्यांनी ऐकवलाच; पण पशु-पक्ष्यांच्या वर्तनसवयी, शिकार, खाद्य आणि एकूणच मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाऐवजी साहचर्याची भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. प्राची मेहता यांच्या घुबडांवरील सर्वांगीण माहिती देणाऱ्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मृदुला केळकर यांच्या ‘मानव व वन्यप्राणी सहअस्तित्व’ या विषयावर आधारित पपेट शोला बाळगोपाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. देशातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी अर्पित मैराल यांचे तेथील व्याघ्रसंवर्धनाविषयीचे विशेष सादरीकरण आणि रेस्क्यू ऑपरेशनचे व्हिडिओ मुलांसह पालकांसाठी लक्षवेधक ठरले. अखेरच्या सत्रात अद्वैत दिंडोरेनिर्मित ‘इंडियन वूल्फ्ज’ या लघुपटाचे प्रदर्शन झाले. अनुज खरे यांनी सूत्रसंचालन केले.