राशी मल अभिनीत ‘द मिसिंग स्टोन’ नुकतीच एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली. राशी यात ‘पायल’ नामक व्यक्तिरेखा साकारते आहे, जिच्यामुळे एक रहस्यमय घटनांची मालिकाच सुरू होते आणि तोच या वेधक थ्रिलरचा मुख्य आधार आहे.

राशी म्हणते, “या मालिकेत पायल या व्यक्तिरेखेचा जो प्रवास आहे त्यानेच मला ही पटकथा निवडण्यास उद्युक्त केले. दोष आणि विक्षिप्तपणा स्वभावात असलेली ही एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे. म्हणूनच मला ही व्यक्तिरेखा शक्य तितकी वास्तविक वाटावी अशाप्रकारे साकारायची होती. मी हे पात्र उभे करण्यासाठी व्यवस्थित वेळ घेतला. या मालिकेत तीन मुख्य व्यक्तिरेखांचा प्रवास आहे आणि प्रत्येक पावलागणिक गूढ रहस्य उलगडत जातात. भारतात सायकॉलॉजिकल थ्रिलर हा प्रकार हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे आणि ‘द मिसिंग स्टोन’ प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या जागेवर खिळवून ठेवेल”, असं की म्हणाली.

राशी पुढे म्हणते, “लॉकडाउन असताना याचे शूटिंग झाले, पण शूटिंगचा अनुभव खूप छान होता. मला विशेष करून अॅक्शन दृश्ये करायला आवडतात आणि मला तशी दृश्ये करण्याची संधीही या मालिकेत मिळाली.”

‘हेलिकॉप्टर ईला’ मध्ये झळकलेली ही अभिनेत्री सांगते की तिला ही व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक फक्त सुष्ट किंवा दुष्ट अशी एकेरी रंगवायची नव्हती, तर आपल्या अभिनयातून मानवी अनुभवांचे सर्व कंगोरे अभिव्यक्त करायचे होते. तिने नेहमी अनोख्या आणि अभिनयाला वाव असणार्‍या भूमिका स्वीकारल्या आहेत, जशा की, ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘सर’मधल्या तिच्या भूमिका, आणि आपला हाच बाणा तिने प्रस्तुत मालिकेतील आपल्या भूमिकेतही जोपासला आहे.

राशी नमूद करते की, बरून सोबती आणि बिदिता बाग या सह-कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता. सेटवर तिला मोकळेपणा जाणवून दिल्याबद्दल ती सोबती आणि बाग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.