सध्या सोशल मीडियावर दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या ‘बाबा का ढाबा’चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचं मन हेलावलं असून काही जण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तसंच सामान्यांप्रमाणेच काही सेलिब्रिटींनीदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन हिनेदेखील हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

”बाबा का ढाबा’. दिल्लीवालो दिल दिखाओ. जो कोणी इथे येऊन जेवेल त्यांनी मला एक फोटो पाठवा. तो फोटो मी सोशल मीडियावर शेअर करेन. सोबतच तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवेन”, असं आवाहन रविनाने नेटकऱ्यांना केलं आहे.


व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीतील मालवीय नगर येथील असून तेथे दोन वयस्कर व्यक्ती एक खानावळ चालवतात. ‘बाबा का ढाबा’ असं त्यांच्या खानावळीचं नाव आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कोणतेही गिऱ्हाइक येत नसल्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. म्हणूनच दोन्ही वयस्कर व्यक्ती यात रडताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रविनाप्रमाणेच सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील बाबा का ढाबाच्या मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे.