‘तंटा नाय तर घंटा नाय..’ या संवादाला शब्दश: काही अर्थ नाही. पण, सध्या हा संवाद आणि तो म्हणणारा माऊली महाराष्ट्रभर गाजतो आहे.  ‘हमशकल’ आणि ‘एक व्हिलन’ या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे रितेश चांगलाच सुखावला आहे. आता लगोलग त्याची मुख्य भूमिको असलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ हा रितेशचा पहिलाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून गावोगावी फिरत असलेल्या रितेशला चाहत्यांचे हे अजब प्रेम सध्या अनुभवायला मिळते आहे. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही हिंदी चित्रपटांना यश मिळाले असले तरी सगळीकडे त्याचा उल्लेख त्याच्या चित्रपटातील ‘माऊली’ या नावावरूनच केला जातो आहे. मराठी चित्रपटाच्या नायकाला क्वचितच अनुभवायला मिळणारे हे कवतिक अभिनेता रितेश देशमुखच्या वाटय़ाला आले असून चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या माऊलीला लोकांनी उचलून धरले आहे. कोल्हापूरला चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी पोहोचलेला रितेश महालक्ष्मी मंदिरात दर्शनसाठी जाणार होता. रितेश येणार हे कळताच मंदिराच्या ज्योतिबा द्वारापासून ते प्रत्यक्ष मंदिराच्या प्रांगणातही तासभर आधीच लोक त्याच्यासाठी ताटकळत उभे राहिले. आणि रितेश येताच सगळ्यांनी माऊली.. माऊली नावाचा हाकारा सुरू केला. नागपूर, औरंगाबाद अशा प्रत्येक ठिकाणी रितेशचे जंगी स्वागत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुद्द रितेशही लोकांच्या या प्रेमाने भारावला असून खूप वर्षांनी मराठी लोकांशी पुन्हा आपल्या तारा जोडल्या गेल्या याचा जास्त आनंद झाल्याचे त्याने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. ‘हमशकल’ आणि ‘एक व्हिलन’ यशस्वी झाले असले तरी आत्ताआपले सगळे लक्ष ‘लय भारी’वर केंद्रित असल्याचे त्याने सांगितले. माऊली आणि त्याचे संवाद केवळ प्रोमोजवरून लोकप्रिय होतील, असे वाटले नव्हते. मात्र, परदेशात गेल्यावरही आपल्याला पाहून जेव्हा जय महाराष्ट्रची साद दिली जाते तेव्हा जास्त आनंद होतो, अशी भावना रितेशने बोलून दाखवली.
माऊलीचा हा जयजयकार सोशल मीडियावरही जोरात सुरू असून कित्येकांनी माऊलीच्या रुपातील रितेशची छायाचित्रे, त्याचे संवाद, रितेश आणि जेनेलियाची रेखाचित्रे सोशल मीडियावर टाकले आहेत.