16 December 2017

News Flash

बिग बींच्या वाढदिवशी रोहित शेट्टीने केली ‘ही’ मोठी घोषणा

अखेर रोहित शेट्टीचे स्वप्न पूर्ण होणार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 11, 2017 3:36 PM

अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी

बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ७५ व्या वाढदिवशी निर्माता दिग्दर्शिक रोहित शेट्टीने एक मोठी घोषणा केली आहे. ‘नवभारत टाइम्स डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत रोहितने बिग बींसोबत व्यावसायिक चित्रपट निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करण्याचे रोहितचे स्वप्न होते. त्यासाठीच सध्या दमदार कथेच्या शोधात असल्याचेही त्याने म्हटले.

या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘गेल्या काही दिवसांपासून मी एका अशा दमदार कथेच्या शोधात आहे, ज्यावर मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करू शकेन. माझ्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारावी, हे माझे स्वप्न आहे. त्यांच्यासोबत मी पूर्णपणे व्यावसायित चित्रपटाची निर्मिती करेन. ते माझे सर्वांत आवडते अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे कामाविषयी असलेली गंभीरता. कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शूटला ते कधीच उशिरा पोहोचत नाहीत. वेळेचे मूल्य ते जाणतात. त्यांच्यासोबत माझे एक वेगळेच नाते आहे.’

वाचा : अनुष्काच्या क्लोथिंग ब्रँडने चायनीज वेबसाइटवरून डिझाइन्स केले कॉपी?

‘अमिताभ यांच्यासोबतच्या एका घटनेनंतर मी त्यांचा चाहता झालोय. ती घटना मी तुम्हाला आता सांगितली तर ते नाराज होतील. ते सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजही त्यांच्या जीवनात कामाचे खूप महत्त्व आहे आणि याच विचारांमुळे ते यशाच्या अत्युच्च शिखरावर आहेत,’ असेही तो पुढे म्हणाला.

वाचा : आदित्य पांचोली कंगनाला कोर्टात खेचणार

रोमान्स आणि अॅक्शन यांचा परफेक्ट तडका असणाऱ्या चित्रपटांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. आता बिग बींसोबत तो कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार, त्यामध्ये बिग बींची काय भूमिका असेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान, रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘गोलमाल अगेन’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच तो सध्या व्यग्र आहे. यामध्ये अजय देवगण, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्षद वारसी, परिणीती चोप्रा आणि तब्बू यांच्या भूमिका आहेत.

First Published on October 11, 2017 3:36 pm

Web Title: rohit shetty says he will make a hardcore commercial film with amitabh bachchan