बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होत आहे. या दुसऱ्या सिझनविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कथेविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

‘अमर उजाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सैफने ही सीरिज का स्वीकारली यामागचे कारण सांगितले. ‘मी स्वत:च्या निर्णयांवर विश्वास ठेवतो. नेटफ्लिक्सवर मी बरेच शोज पाहिले आहेत आणि मला ते आवडलेसुद्धा. हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे. इथे मीसुद्धा निर्माता होऊ शकतो असा विचार सुरू असतानाच मला सेक्रेड गेम्सची ऑफर आली आणि मी जराही विचार न करता त्याला होकार दिला,’ असं त्याने सांगितलं.

दुसऱ्या सिझनमध्ये सरताज सिंगच्या भूमिकेबद्दल तो पुढे म्हणाला, ‘या सिझनमध्ये सरताज पहिल्यापेक्षा अधिक फिट आणि गतिशील आहे. यामध्ये जास्त अॅक्शन पाहायला मिळेल. सरताजच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या वादावरसुद्धा लक्ष केंद्रीत केली जाईल. त्याचसोबत त्याच्या वडिलांविषयीही कथा दाखवण्यात येईल.’

Sacred Games 2 : गायतोंडे, सरताज सिंगसह कलाकारांचा रेट्रो अंदाज

या मुलाखतीत सैफने वेब सीरिजच्या सेन्सॉरशिपबद्दलही मत मांडलं. ‘सेक्रेड गेम्समध्ये माझ्या भूमिकेला फार शिव्या नाहीत. कथेची गरज असल्याने असे संवाद लिहिले जातात. चित्रपटांमध्ये फार बंधने असतात. माझ्या मते इथे प्रेक्षकांसमोर सत्य दाखवलं जातं. ‘एलओसी’मध्ये जेव्हा मी पाकिस्तानी सैन्याला पाहतो तेव्हा शिव्या देणारे एक-दोन संवाद होते. सेन्सॉरशिपमुळे त्या संवादावर कात्री लागली. वेब सीरिजमध्ये असं होत नाही. खऱ्या आयुष्यात जे जसं असतं ते तसंच दाखवलं जातं. खऱ्या आयुष्यात राग आल्यास आपण अपशब्द वापरतोच ना.’

दुसऱ्या सिझनसाठी सैफने बरीच मेहनत घेतली आहे. आता २५ दिवसांत नेमकं काय होणार, सरताज सिंग शहराला वाचवू शकेल का या सर्व गोष्टी या सिझनमध्ये उलगडण्याची शक्यता आहे.