नेटफ्लिक्सची ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसिरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेबसिरिजमधून कुब्रा सैत हे नावही चर्चिलं जात आहे. कुब्रा ‘सेक्रेड गेम्स’मध्ये ‘कुक्कू’ या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत आहे. या वेबसिरिजमधल्या एका दृश्यासाठी किमान सात वेळा विवस्त्र व्हावं लागल्याचं नुकतंच तिनं एका मुलाखतीत सांगितलं.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी ‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक आहेत. कुब्रा उर्फ कुक्कू आपली तृतीयपंथीयाची ओळख लपवून ठेवते. तिचं हे खोटं नवाजुद्दीनला समजतं त्यावेळी तो तिला विवस्त्र होण्यास सांगतो अशा स्वरुपाचं हे दृश्य होतं. मात्र या दृश्यांत कुब्राकडून जसा अभिनय अपेक्षित होता तसा तिनं केला नाही म्हणूनच जवळपास ७ वेळा या सीनसाठी सीटेक घेण्यात आल्याचं कुब्रानं नुकतंच एका मुलाखतीत उघड केलं. इतकंच नाही तर मद्यपान करायला सांगून मला काही डायलॉग्सही बोलायला लावले असंही ती मुलाखतीत म्हणाली. ‘हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं त्यामुळे संकोचलेपणा मला आला. मी भावूक झाले यासाठी कश्यप यांनी माझी अनेकदा माफी मागितली. पण मी हे दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा ते खरंच अप्रतिमरित्या चित्रित करण्यात आलं होतं’, असंही सांगायला ती विसरली नाही.

विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारीत ही वेब सीरीज आहे. नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील काही दृश्यांत माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढून टाकावेत अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे त्यामुळे ही मालिका वादात सापडली होती.