बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा लवकरच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली होती. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर टीका केली जात होती. आता सैफने त्याचे विधान मागे घेतले आहे.
विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खानचे स्पष्टीकरण शेअर केले आहे. ‘एका मुलाखतीदरम्यान माझ्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला. मी अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याची मला जाणीव झाली. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो’ असे सैफ म्हणाला आहे.
View this post on Instagram
पुढे म्हणाला की, ‘प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी नेहमीच शौर्याचे प्रतीक आहेत. सर्व वाईट गोष्टींवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करणे म्हणजे आदिपुरुष. कोणतीही विकृती न दाखवता हा चित्रपट सादर करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र काम करत आहे.’
काय म्हणाला होता सैफ अली खान?
सैफ अली खान ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने या भूमिकेवर भाष्य केले होते. “रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिले आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचं नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणाची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे” असे सैफ म्हणाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 7:35 pm