27 February 2021

News Flash

बिग बॉस परतला

‘बिग बॉस’चा शो अशा दुहेरी आनंदात असलेल्या सलमानशी झालेल्या गप्पा..

|| अभिषेक मुठाळ

यावर्षी ईदच्या मुहूर्तावर ‘बॉक्स ऑफिस’ची रेस जिंकल्यानंतर ‘बिग बॉस सीझन १२’च्या निमित्ताने सलमान खान पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर त्याच्या आवडत्या भूमिकेत परतला आहे. ‘बिग बॉस’च्या या पर्वात ‘विचित्र जोडी’ अशी संकल्पना आहे. या संकल्पनेवर स्वत: सलमाननेच खास वेगळ्या अवतारात प्रोमोज शूट केले आहेत. एकीकडे आगामी ‘भारत’चे चित्रीकरण आणि त्याच वेळी ‘बिग बॉस’चा शो अशा दुहेरी आनंदात असलेल्या सलमानशी झालेल्या गप्पा..

‘विचित्र जोडीयों’ के साथ होनेवाला है इस साल का ‘बिग बॉस’.. सीजन बारा..मैं आरा आरा आरा..’, अशा प्रकारचे विचित्र प्रोमो वाहिन्यांवर झळकू लागले. त्यात दाखवलेली मामा-भाच्याची जोडी, सासू-सुनेची जोडी अशा वेगळ्याच जोडय़ा या शोच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत आणि त्यांना एका घरात खेळवण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे सलमान खानवर आहे. ‘बिग बॉस’च्या खेळात जर एखादी गोष्ट चुकली तर तू त्यावर भूमिका घेताना दिसतोस, मात्र हा कार्यक्रम नेहमीच काही ना काही गोष्टींमुळे वादग्रस्त ठरतो. यात अनेकदा चुकीच्या किंवा अश्लील गोष्टीही घडतात. त्याबद्दल विचारले असता तो बिनधास्तपणे उत्तरला, हो हे मला मान्य आहे की काही प्रमाणात हा कार्यक्रम वादग्रस्त आहे. पण काहींना हा कार्यक्रम आवडतो काहींना आवडत नाही. आपल्या सर्वाच्या काही गोष्टी आवडत्या असतात त्याचप्रमाणे काही नावडत्याही असतात. आपण त्याच दृष्टीने त्या कार्यक्रमाकडे पाहात असतो. ‘बिग बॉस’ या शोची अडचण अशी झाली आहे की यामध्ये आलेला खेळाडू हा ‘टीआरपी’साठी काही गोष्टी मुद्दाम करू लागला आहे. पण शेवटी ते काही दिवस इथे राहायला लागल्यानंतर त्यांचा खरा स्वभाव समोर येतो आणि मग त्यातून आपल्याला लक्षात येतं की हा माणूस कसा असेल. माझं काम एवढंच की मी त्यांना अमुक गोष्टी करू नका वगरे सांगतो आणि काही अश्लील गोष्टी प्रेक्षकांसमोर जाता कामा नयेत हाच माझा प्रयत्न असतो. मात्र त्याच वेळी घरात काय घडतं? हे दाखवताना काही गोष्टी टाळता येत नाहीत. तरीही त्यातील जितक्या वाईट गोष्टी असतील तितक्या काढण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

‘बिग बॉस’ने मराठी अवतारही धारण केला. त्याबद्दल बोलताना, हो.. या शोची सूत्रं महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. हिंदीच्या तुलनेने मराठीत वाद कमी झाले. मात्र खेळ म्हटला की त्यात वाद होणारच. हिंदीत तो जास्त होतो. कारण वेगवेगळ्या संस्कृतीतली माणसं तिथे एकत्र असतात. मुळात या खेळात कुठल्या प्रकारचे सदस्य आहेत त्यावर वाद कमी की जास्त हे अवलंबून असते. स्वत:ला खेळातून बाहेर होण्यापासून वाचवण्याची धडपड या खेळात दिसते. त्यामुळे इथे वाद जास्त दिसतात. मग ते शारीरिक असो किंवा मानसिक, असेही सलमाने सांगितले.

खरं सांगायंच तर मलाही हा खेळ खेळायला अवघड वाटतो. कारण दोन-दोन दिवसांचे ‘टास्क’ दिले जातात. त्यात एक संपला की लगेच दुसरा सुरू होतो. जेवण नाही. तुम्ही तुमच्या घरच्या लोकांपासून दूर असता.. असं बोलता बोलता मध्येच गमतीने डोळे मोठे करून तो या खेळात सहभागी होणाऱ्या प्रेमीजनांविषयीचा अनुभव सांगतो. एकतर प्रियकर बाहेर असतो. त्याला माहिती असतं की ती आत गेली आणि एवढय़ात काही बाहेर येत नाही. त्यामुळे तो खुशीत असतो. तर तिकडे तिला मात्र खेळाचा आणि बाहेर आपला प्रियकर काय करत असेल, याचाही ताण असतो. असा सगळा गमतीचा खेळ असतो. त्यात तुम्ही तीन महिने आत असता आणि तेही काही नावडत्या लोकांबरोबर. ऐकायला सोपं वाटेल पण प्रत्यक्षात तिथे राहणाऱ्यांना काय वाटत असेल हे लक्षात घेतलं पाहिजे, असेही सलमानने स्पष्ट केले.

‘लवरात्री’ या चित्रपटाचा निर्माता सलमान आहे. यात त्याचा मेव्हणा आयुष शर्मा अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याबद्दल त्याला विचारले असता सलमान म्हणाला, अभिनेताच व्हायचं असं ठरवलेल्या आयुषला सोहेलने आधी जिममध्ये बघितलं होतं. आम्ही ‘माय पंजाबी’ नावाचा एक चित्रपट करत होतो त्यासाठी त्याला घ्यायचं असा विचारही केला होता. मग तो सहा महिन्यांनंतर घरी वडिलांबरोबर आमची बहीण अर्पिताला लग्नाची मागणी घालण्यासाठी आला. त्यावेळी सोहेलने मला त्याची ओळख करून देत याच मुलाचा ‘माय पंजाबी’ चित्रपटासाठी विचार केला होता, अशी माहिती दिली. त्यानंतर मग आपोआपच संबंध जुळले आणि हा प्रवास आता ‘लवरात्री’पर्यंत येऊन ठेपला आहे. मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा सध्या तरी माझा विचार नाही पण रितेशच्या आगामी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणार असून सध्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या कामात व्यग्र असल्याचेही तो म्हणाला.

गेली नऊ वर्षे मी ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करत आहे. या शोच्या निमित्ताने अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. माणसांचे स्वभाव, एकमेकांशी वागण्यातून त्यांच्यात निर्माण होणारे वाद हे सर्व जवळून अनुभवताना कसं असावं आणि कसं नसावं याबद्दल अनेक गोष्टी लक्षात येतात. हा शो म्हणजे माझ्यासाठी एक वेगळाच मानसिक प्रवास आहे.

मी जे चित्रपट करतो ते माझ्यासाठी अर्थपूर्ण आणि समांतरच असतात. जो चित्रपट पैसा कमावतो, चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक जो चित्रपट पाहायला गर्दी करतात तो चित्रपट माझ्यासाठी अर्थपूर्ण आहे. जर प्रेक्षक अर्थपूर्ण चित्रपटांना जातच नसतील तर त्या चित्रपटांचा काय फायदा आहे? ते चित्रपट आशयघन असले तरी आपल्याला अपूर्णच वाटतात.        – सलमान खान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:52 am

Web Title: salman khan bigg boss 12
Next Stories
1 उत्सवगीतांचा नूर आणि सूर
2 शाहरूखसाठी एकताची ‘कसौटी आठ कोटींची ’
3 सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’
Just Now!
X