काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता सलमान खानला जोधपूर कारागृहात व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे. सलमान खानला ज्या बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे तिथे रात्री त्याच्या झोपण्यासाठी विशेष एअर कुलरची व्यवस्था करण्यात आली होती. एका मुख्य अधिकाऱ्याच्या रुममधला एअरकुलर तात्पुरता सलमानच्या बराकीमध्ये हलवण्यात आला होता असे इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

सलमानने तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याची माहिती आहे. जोधपूर कारागृहाचे जेलर आणि उप पोलीस महानिरीक्षकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह सलमानची भेट घेतली. यावेळी तुरुंगातच सलमानसोबत सेल्फी फोटो काढण्यात आले असे वृत्तात म्हटले आहे.

सलमान तुरुंगात गेल्यापासून जोधपूर कारागृहात सेल्फी काढण्याची एक लाट आली आहे. अनेक पोलीस अधिकारी सलमानकडे सेल्फीसाठी आग्रह धरत आहेत आणि सलमाननेही त्यांना निराश केलेले नाही. सलमानने जेलमधील पहिली रात्री वातानुकूलित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुममध्ये काढली. तिथे टीव्ही संचाची सुद्धा व्यवस्था होती. त्यावेळी तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी त्याच्यासोबत होते. मध्यरात्रीपर्यंत हे अधिकारी सलमानसोबत होते असे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी अनेकांनी तुरुंगात येऊन सलमान खानची विचारपूस केली. यात अभिनेत्री प्रीती झिंटाचाही समावेश आहे. सकाळी सर्वात आधी सलमानचे वकिल हस्ती मल सारस्वत त्याला भेटले. सलमानच्या दोन बहिणी अल्वीरा आणि अर्पिता तसेच त्याचा अंगरक्षक शेराने त्याची दुपारी भेट घेतली.

आम्ही सलमानला भेटायला आलो आहोत. डीआयजींबरोबर बोलणे झाले आहे असे शेराने सांगितले. सर्वसामान्य कैद्याला या सर्व सुविधा मिळत नाहीत. तुरुंगात असूनही सलमानला त्याच्या नेहमीच्या सिगारेटस मिळाल्या. संध्याकाळी त्याने नेहमीप्रमाणे काहीवेळ व्यायाम केला असे सूत्रांनी सांगितले.