देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु आहे. महाराष्ट्रातही करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. परंतु, राज्यात सध्या लसींचा तुटवडा भासत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच जाहीर केलं. लसींच्या कमतरतेमुळे काही ठिकाणचं लसीकरण थांबवण्यातही आलं आहे. या प्रकरणी अभिनेता संदीप पाठकने ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.

मराठी अभिनेता संदीप पाठकने आपल्या ट्विटर हँडलवरुन सर्व राजकारण्यांना तसंच सरकारलाही प्रश्न विचारला आहे. “देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असताना इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का?”, असा सवाल संदीपने उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्याने सर्व राजकीय पक्षांना आवाहनही केलं आहे. तो म्हणतो, “आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असु द्यावं.”

पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस करोनाग्रस्त होत असल्याची खंतही त्याने यावेळी व्यक्त केली आहे. त्याच्या या ट्विटला अनेकांनी उत्तरही दिलं आहे. अनेकांना त्याची ही मते पटली असून त्यांनी संदीपला पाठिंबा दिला आहे. तर एका युजरने कोणत्या राज्याला किती लसपुरवठा झाला याबद्दलची आकडेवारीही दिली आहे. एक युजर म्हणते, “तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा..महाराष्ट्राला लस द्या.”

संदीपने महाराष्ट्राला लसींची गरज असल्याचं #MaharashtraNeedsVaccine असा हॅशटॅग वापरून सांगितलं आहे.
“परखडपणे आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद, काहींना तेसुद्धा जमत नाही”, असं म्हणत एका युजरने संदीपचं कौतुकही केलं आहे.