बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेले असून, त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार येत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. ‘संजय दत्त प्रॉडक्शन’ या संजय दत्तच्या स्वत:च्या निर्मितीसंस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त, हिराणी आणि विधू विनोद चोप्रा हे संयुक्तरित्या करणार आहेत. संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांनी या अगोदर ‘मुन्नभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या नावाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

संजय दत्तवरील बायोपिकच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर हा संजूबाबाची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे, साँवरिया चित्रपटाने रणबीरसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूर त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. तसेच, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे कळते. चित्रपटात संजयचे वडिल म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिका अक्षय खन्ना आणि त्याच्या आईची भूमिका तब्बू साकारणार असल्याचे कळते. दरम्यान, या चित्रपटावर काम करण्याकरिता रणबीर सतत संजूबाबाची मदत घेत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याची माहिती स्वतः राजकुमार हिरानी यांनी ट्विटरवरून दिली. चित्रपटात सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अनुष्का यात पत्रकाराची तर सोनम ही संजूबाबा प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याचे कळते. पण, त्याव्यतिरीक्तही यात तिस-या अभिनेत्रीचा आता समावेश झाला आहे. अभिनेत्री दिया मिर्झादेखील चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. चित्रपटाच्या टीमसोबत केक कापतानाचा एक फोटो दियाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊन्टवरून शेअर केला आहे.

या फोटोसह दियाने लिहलेय की, जगातील सर्वात आनंददायी जागा म्हणजे राजकुमार हिरानीच्या चित्रपटाचा सेट. सदर फोटोत दियासह रणबीर कपूर, राजकुमार हिरानी, अभिजीत जोशी आणि विक्की कौशल हे दिसत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या चित्रपटाकरिता दियाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटासाठी फक्त सोनम आणि अनुष्काच्याच नावाचीच चर्चा आहे. दियाने याआधी राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई’ चित्रपटातही काम केले होते.