‘पद्मावत’वरून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आणि चित्रपटाला करणी सेनेकडून झालेला विरोध यावर अखेर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व्यक्त झाले आहेत. ‘कोणत्याही देशासाठी बुद्धीवादी, विचारवंत आणि कलाकार मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची मतं प्रत्येकाला पटतीलंच असं नाही. त्यावर मत- मतांतरं, चर्चा होऊ शकतात आणि ते व्हायलाही हवं. मात्र, आता चर्चा करण्याऐवजी विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आले आहेत,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘पद्मावत’ वादावर प्रतिक्रिया देताना मनातील खदखद भन्साळींनी व्यक्त केली. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मोठमोठे खुलासे द्यावे लागले. तुम्हाला जर स्वत:च्या कलाकृतीसाठी उत्तरं द्यावं लागणं यापेक्षा दुसरी दु:खद गोष्ट नाही, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही मुद्दा उपस्थित केला. ‘मी एक जबाबदार चित्रपट निर्माता आहे. काही मूठभर लोकांना पटत नाही, म्हणून मी खुलासे का द्यायचे, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे खुलासे द्यावे लागतात. एकीकडे सेन्सॉर बोर्ड आणि दुसरीकडे सरकार, मी किती जणांची मर्जी राखू?’ असा सवाल त्यांनी केला.

वाचा : …म्हणून ‘पद्मावत’च्या सेटवर शाहिद पडला एकटा 

ज्यावेळी करणी सेनेकडून चित्रपटाच्या कथेसंदर्भात आरोप होत होते, तेव्हा भन्साळींनी एका व्हिडिओमार्फत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र हे स्पष्टीकरण देणं खूप त्रासदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रेक्षकांसाठी मी अत्यंत जबाबदारीने चित्रपटाची निर्मिती केली. तरीही माझ्यावर खुलासे देण्याची वेळ आली. हा माझ्या प्रामाणिकपणावर आघात होता,’ असंही ते म्हणाले.