गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वामध्ये वेब सीरिजचे क्रेझ पाहायला मिळते आहे. हिंदी आणि इंग्लिश या वेब सीरिजमध्ये आता मराठी वेब सीरिजने देखील पदार्पण केले आहे. अभिनेत्री प्रिया बापटच्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजनंतर आता ‘यू टर्न’ नावाची आणखी एक मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘यू टर्न’ या वेब सीरिजमध्ये ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेम म्हणजे समजली तर भावना, ठेवला तर विश्वास, मांडला तर खेळ आणि निभावले तर वचन. याच प्रेमाची एक नवीन ओळख या वेब सीरिजमध्ये करुन देण्यात आली आहे. सायली आणि ओमप्रकाश या सीरिजमध्ये नवरा बायकोची भूमिका साकारणार आहेत. दरम्यान त्या दोघांमध्ये होणारी सततची भांडणे अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचतात हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

सीरिजच्या नावाप्रमाणे सायली आणि ओमप्रकाश यांचे नाते ‘यू टर्न’ घेणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या वेबसीरिजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी स्क्रीन शेअर करणार असून पहिल्यांदाच हे दोघे एकमेकांसोबत काम करणार आहेत. या सीरिजची निर्मिती नेहा बडजात्या करत आहेत. तर दिग्दर्शनाची धूरा मयुरेश जोशी यांनी स्वीकारली आहे. या सीरिजच्या माध्यमातून राजश्री मराठी पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करणार आहे.