News Flash

पुढच्या दोन वर्षांत गाजलेल्या हॉलिवूड सिक्वलपटांचा पाऊस

हॉलीवूडमध्ये गाजलेल्या विषयांवरचे सीक्वेलपट हे कायम यशस्वी ठरले आहेत.

हॉलीवूडमध्ये गाजलेल्या विषयांवरचे सीक्वेलपट हे कायम यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे कॉमिकपटांवरील आधारित सुपरहिरोपटांबरोबरच ‘जेम्स बाँड’, ‘स्टार वॉर’, ‘फास्ट अँड फ्युरिअस’सारख्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांच्या मालिकाही हॉलीवूडसह सगळीकडे यशस्वी ठरले आहेत. या वर्षी हॉलीवूडच्या सीक्वेलपटांनी आपल्याकडे तिकीटबारीवर शंभर कोटींची कमाई केली असल्याने पुढच्या दोन वर्षांत रांगेने गाजलेले हॉलीवूड सिक्वेलपट आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
या वर्षी हॉलीवूडचे जे सीक्वेलपट इथे प्रदर्शित झाले त्यांनी चांगलीच कमाई केली. यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्पेक्टर’ या बाँडपटासह, इरफान खानची भूमिका असलेला ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’, ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’, ‘हंगर गेम्स पार्ट २’, ‘मिशन इम्पॉसिबल’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ या चित्रपटाने तर इथे तिकीटबारीवर शंभर कोटी रुपयांचा गल्ला गोळा करत बॉलीवूडच्याही पोटात गोळा आणला होता. जेनिफर लॉरेन्स या ऑस्करविजेत्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेल्या ‘हंगर गेम्स’लाही चांगला प्रतिसाद मिळाला. सीक्वेलपटांना केवळ हॉलीवूडमध्येच नव्हे, तर जगभरात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता याच गाजलेल्या चित्रपटांच्या अजून काही नवनवीन आवृत्त्या येत्या दोन ते तीन वर्षांत पाहायला मिळणार आहेत. ‘स्टार वॉर’ या एके काळी गाजलेल्या लहान मुलांच्या चित्रपटाची सातवी आवृत्ती ‘स्टार वॉर : द फोर्स अवेकन’ हा चित्रपट नाताळच्या निमित्ताने सगळीकडे प्रदर्शित होतो आहे. खूप गॅपनंतर आलेल्या या नव्या आवृत्तीला जगभरातून लक्षणीय प्रतिसाद मिळेल, असा हॉलीवूडमधील तज्ज्ञांचा होरा आहे. या चित्रपटाला भारतात किती प्रतिसाद मिळेल, याबद्दल साशंकता असली तरी नाताळच्या सुट्टीत एकही लहान मुलांचा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने हा चित्रपट त्यांच्यासाठी पर्वणी ठरू शकतो. पुढच्या वर्षी या सीक्वेलपटांचा शुभारंभ ‘माव्‍‌र्हल’च्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रमालिकेचा भाग असलेला ‘कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर’ या चित्रपटाने होणार आहे. मे महिन्यात प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटात क्रिस इव्हानने साकारलेल्या ‘कॅप्टन अमेरिका’बरोबर आयर्न मॅन (रॉबर्ट डाऊनी ज्यु) आणि ब्लॅक विडो (स्कार्लेट जॉन्सन) या ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘आइस एज’ या गाजलेल्या अ‍ॅनिमेशनपटाचा पाचवा भागही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असून ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ हा सुपरहिरोपट मालिकेतील चित्रपटही पाहायला मिळणार आहे.
‘फास्ट अँड फ्युरिअस’च्या सातव्या आवृत्तीला यश मिळाल्यानंतर अभिनेता व्हिन डिझेलने आठव्या आवृत्तीचीही घोषणा केली होती. अर्थात, हा आठवा सीक्वेल प्रदर्शित होण्यासाठी दोन वर्षे जाणार आहेत. ‘ज्युरासिक वर्ल्ड’च्याही सीक्वेलची तयारी सुरू झाली असून त्यालाही दोन वर्षे लागणार आहेत. २००० साली प्रदर्शित झालेल्या आणि सर्वाधिक गल्ला कमावणारा १४ वा सीक्वेलपटांचा बादशहा म्हणून ओळखल्या गेलेल्या ‘एक्समेन’ मालिकेतील दोन चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होणार आहेत. ‘एक्समेन : अपोकॅलिप्स’ हा चित्रपट पुढच्या वर्षी, तर ‘वुल्वरिन’चा तिसरा भाग २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडची पुढच्या दोन वर्षांतील आर्थिक गणिते ही बऱ्यापैकी या सीक्वेलपटांच्या यशावर अवलंबून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 8:37 am

Web Title: sequels upcoming year
टॅग : Entertainment
Next Stories
1 सारा तेंडुलकर आणि जस्टिन बीबरचे छायाचित्र व्हायरल
2 पाकिस्तानी कार्यक्रमात शाहरुख, काजोल करणार चित्रपटाची प्रसिद्धी
3 सुखविंदर सिंग यांची अभिनयाची नवी इनिंग
Just Now!
X