एका युरोपियन वेबसाइने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये किंग खानच्या मृत्यूची बातमी देण्यात आली होती. या वृत्ताला आता बॉलिवूडच्या बादशहाने आपल्या अनोख्या अंदाजात उत्तर दिले आहे. शाहरुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक सेल्फी पोस्ट करत मेसेज लिहिला की, ‘विमानाचा अपघात आणि सेटवरील सिलिंग कोसळून झालेल्या भयानक अपघातानंतरही वाचलो.’ काही दिवसांपूर्वी एका युरोपियन वेबसाइने शाहरुखशी निगडीत बातमी प्रसिद्ध केली होती. यात त्याचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

विमान अपघातात शाहरुखचा मृत्यू झाल्याच्या अफवा

मिळालेल्या वृत्तानुसार, शाहरुखसह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवली होती. त्यांची ही बातमी थोड्याच वेळात इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली. हवामानातील बदलामुळे किंग खानच्या विमानाला अपघात झाल्याचं या बातमीतून सांगण्यात आलं. तो आपल्या सहाय्यकासोबत ‘गल्फस्ट्रीम जी ५५०’ या खासगी विमानाने प्रवास करत असून पॅरिसला जात होता, असंही या बातमीत म्हटलं गेलं होतं. इतकच नव्हे तर, शाहरुखच्या मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरल्याचंही म्हटलं गेलं होतं. या बातमीमुळे अनेकांनीच शाहरुखला आणि त्याच्या टीमला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शाहरुखने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून अफवांना योग्य असे उत्तरही दिले आहे.

https://www.instagram.com/p/BU1UjETDnhO/

प्रसिद्ध कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीची अफवा उडवणं हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. शाहरुखच्या आधीही अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्य राय बच्चन, दिलीप कुमार, राजपाल यादव, फरीदा जलाल, कतरिना कैफ यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता या यादीत शाहरुख खानचे नावही जोडले गेले आहे.