गेल्या काही दिवसांपासून नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलवर मराठी कलाकारांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या कलाकारामध्ये अभिनेते विक्रम गोखले, अभिनेता सुमित राघवन, सुबोध भावे आणि इतर कलाकारांचा समावेश होता. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने देखील लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधताना नाट्यगृहांमध्ये वाजणाऱ्या मोबाईल संदर्भात वक्तव्य केले आहे.

नाटगृहांमध्ये प्रयोगादरम्यान मोबाईल फोन वाजतात. हे फोन वाजणे थांबवण्यासाठी कलाकारांनी नाट्यगृहामध्ये जामर बसवण्याचा पर्याय देखील सांगितला होती. या विषयाकडे तू कसा पाहतोस असा प्रश्न संकर्षणला विचारण्यात आला होता. त्यावर संकर्षणने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘नाट्यगृहांमध्ये जामर बसवणे हा निर्णय मला फार आवडत नाही. कारण जामरची काही गरज नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात सुज्ञ असतो. प्रेक्षकही सुज्ञ आहेत आणि कलाकारही सुज्ञ आहेत. त्याचा इतका गाजावाजा करण्याची गरज नाही असे मला वाटते’ असे संकर्षण म्हणाला.

‘नाटकादरम्यान मोबाइल वाजल्यामुळे आमचं त्यावरुन मनच उडतं असं म्हणणाऱ्यांनी आणखी मन लावून नाटक पाहावे. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ३०० रुपये दिलेत, त्यांचा मोबाइल वाजतोय हे त्यांचे नुकसान आहे. मी मान्य करतो की कधी कधी वाजणाऱ्या मोबाइलमुळे त्रास होतो. पण त्याचा गाजावाज का करु नये तर समजूतदारपणाने तो प्रश्न सोडवावा. कुठल्या गोष्टीची शक्ती का करायची?’ असे स्पष्ट मत संकर्षणने मांडले आहे.