करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात लॉकडाउन करण्यात आला. या काळात अनेक उद्योग -व्यवसाय ठप्प झाले. त्याचप्रमाणे या बंदचा परिणाम कलाविश्वावरही झाला. मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण, प्रदर्शन, प्रमोशन सारं काही अर्ध्यावर राहिल्याचं पाहायला मिळालं. परिणामी, कलाविश्वातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यात काही कलाकारांनादेखील आर्थिक फटका बसला. त्यातच बिग बॉस १४ चा स्पर्धक शार्दुल पंडित यालादेखील आर्थिक फटका सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
अलिकडेच शार्दुलने लॉकडाउनमध्ये त्याला जी संकटं आली त्यावर भाष्य केलं आहे. तसंच या संकट काळात अभिनेता करण पटेल आणि अंकिता भार्गव पटेल या दोघांनी त्याला मदत केल्याचंदेखील सांगितलंय

“लॉकडाउनच्या काळात हातात कोणतंच काम नव्हतं. परिणामी, मला थोड्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी माझ्याकडे साधे प्रोटिन शेक घेता येईल इतकेदेखील पैसे नव्हते. त्यामुळे मला या शोमध्ये प्रोटीन शेक न घेताच यावं लागलं”, असं शार्दुल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “तो काळ खरंच फार बिकट होता. मी कोणाताही स्टार नाही, मला खरंच फार संकंट आली. एक वेळ अशी आली होती की मी स्वत:ला कोंडून घेतलं होतं, सतत रडू कोसळत होतं. माझे अनेक मित्र आहेत, पण माझी अशी अवस्था होती की त्यांच्याशी बोलतानादेखील मला लाज वाटत होती. अनेकदा माझे मित्र मला चित्रपट पाहण्यासाठी बोलवायला येत होते. पण, एका चित्रपटासाठी ३५० रुपये खर्च होतील हा विचार करुनच मला टेन्शन यायचं”.

दरम्यान, शार्दुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत बंदिनी, ‘गोद भराई’, ‘कितनी मोहब्बत है’ आणि ‘कुलदिपक’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.