करोना व्हायरसची लाट संपल्यानंतर पुन्हा शूटिंग सुरू झाल्यावर इंटिमेट सीन कसे शूट करणार असा प्रश्न दिग्दर्शक शूजित सरकारला पडला आहे. मिठी मारणे, किसिंग सीन करण्यास कलाकार तयार होतील का, असा प्रश्न त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित मांडला आहे.

‘पिंक’, ‘पिकू’, ‘मद्रास कॅफे’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक शूजितने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, “हे सर्व संपल्यानंतर चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष करून किसिंग सीन व मिठी मारण्याचे सीन. हे सीन एकमेकांच्या जवळ येऊन शूट करतील की लांबूनच… किंवा काही वेळासाठी इंटिमेट सीन चिटींग करून शूट केले जातील?”

शूजितच्या या प्रश्नावरून सोशल मीडियावर बरीच मतमतांतरे झाली. अभिनेत्री दिया मिर्झानेही या चर्चेत सहभाग घेतला. तिने कमेंटमध्ये लिहिलं, “गुरू, चित्रपट बनवण्याची संपूर्ण प्रक्रियाच इंटिमेट आहे. एवढा मोठा चित्रपट बनवण्यासाठी किती लोक एकत्र येतात आणि काम करतात. तुम्ही इंटिमेट सीनचं बोलताय पण साधं शूटिंग करणं पण किती अवघड होईल ते पाहा. संपूर्ण कलाकार व क्रू मास्क आणि ग्लोव्ह्ज घालून असतील का? योग्य वेळ आल्यावरच कळेल.” शूटिंगसाठी अनेकजणांना एकत्र येऊन काम करावं लागतं. अशा वेळी फक्त इंटिमेट सीनच नव्हे तर संपूर्ण चित्रपटच कसा शूट करायचा हा प्रश्न निर्माण होतो, असं काहींनी म्हटलंय.

देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना महाराष्ट्रात आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.