देशातल्या सद्यस्थितीवर अनेक कलाकार सध्या भाष्य करताना दिसत आहेत. बिग बॉस या शोच्या १३व्या भागातला कलाकार सिद्धार्थ शुक्ला यानेही आपलं मत परखडपणे मांडलं आहे. सध्या देशात करोनाचा कहर सुरु आहे. देशभरात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. याबद्दलच सिद्धार्थचं हे नवीन ट्विट आहे.

आपल्या ट्विटमधून सिद्धार्थने ऑक्सिजन सिलेंडरमधून नफा कमावणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “लोक एवढे खालच्या थराला गेलेत हे पाहून दुःख होतं. ज्या गोष्टीमुळे लोकांचा जीव वाचू शकतो अशा ऑक्सिजन सिलेंडर आणि गोळ्या औषधांमधूनही नफा कमवायचा विचार करत आहेत. लोक मरत आहेत पण आज जगात सगळ्यात स्वस्त माणसाचं आयुष्य झालं आहे.”

सिद्धार्थच्या या ट्विटवरती अनेक कमेंट्स येत आहेत. अनेकजण हे रिट्विटही करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “माणसाच्या स्वार्थीपणाची सीमा नाही. जेवढं जास्त आपल्या जवळ असतं तेवढंच आपल्याला आणखी हवं असतं. अनेक लोक असे आहेत जे करोनाबाधित नाहीत. पण तरीही रेशन, दारु, औषधं, रेमडेसिवीर इन्जेक्शन, सिलेंडरही खरेदी करत आहेत कारण त्यांच्याकडे पैसा आहे. हा विचार करत आहेत की मी जिवंत आहे ना मग बाकीच्यांचं मला काही घेणंदेणं नाही.”

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरु आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.