जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये संतापाचं वातावरण असून भारताचा हा निर्णय कशा पद्धतीने चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही पाकिस्तानी तर काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेणार आहोत असा दावा करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापासून ते सामान्यांपर्यंत सगळेचजण भारतावर टीका करत आहेत. यामध्ये गायक आतिफ असलमचं नावही समाविष्ट झालं आहे.
आतिफ असलम मंगळवारी हज यात्रेसाठी रवाना झाला. हज यात्रेला जाण्याआधी आतिफ असलमने काश्मीरसंबंधी एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे भारतीय त्याच्यावर टीका करत आहेत. भारतात राहून आपलं पोट भरणाऱ्या आतिफ असलमने खरा रंग दाखवल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
आतिफ असलमने फेसबुक पोस्ट करत आपण हज यात्रेला जात असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने लिहिलं की, “तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासासाठी निघत आहे. हजला जाण्याआधी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मग ते माझे चाहते असोत की कुटुंबीय किंवा मित्र. जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा”.आतिफ असलमने पुढे लिहिलं आहे की, “यासोबतच काश्मिरींसोबत होत असलेला अत्याचार आणि शोषणाचा मी निषेध करतो. अल्लाह काश्मीर आणि जगातील सर्व निष्पापांची रक्षा करो”.
आतिफ असलमच्या या पोस्टवर भारतीय नाराज असून त्याच्यावर टीका करत आहेत. आतिफ असलम पाकिस्तानी गायक असून अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. भारतातही आतिफ असलमचे अनेक चाहते आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलं होतं.