मानसी जोशी

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिकीटबारीवर यशस्वी झाल्यास त्याच्या पुढील भागाची निर्मिती केली जाते. ‘धमाल’, ‘गोलमाल’, ‘हाऊसफुल’ आणि ‘दबंग’ यासारख्या चित्रपटांचे दोन ते तीन भाग आले आहेत. अर्थात, चित्रपटात सलमान खान असल्यास प्रत्येक भागात त्याची नायिका बदलते. परंतु, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा याला अपवाद ठरली  आहे. ‘दबंग’ चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करणाऱ्या सोनाक्षीचा पंचविसावा चित्रपटही ‘दबंग ३’ आहे, हा खास योगायोग. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘दबंग ३’ चित्रपटात सोनाक्षी रज्जोच्या भूमिकेत परतली आहे. त्या निमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत..

‘दबंग ३’ हा एका अर्थाने हॉलीवूडच्या भाषेत सांगायचे तर प्रीक्वल आहे.  चुलबुल पांडे एक राकट पोलीस अधिकारी का बनला, याची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. त्याबद्दल बोलताना कलाकारांच्या मुलांची जी नवी पिढी आली आहे, त्यांचे आपल्याला कौतुक वाटत असल्याचे सोनाक्षीने सांगितले. कारण चित्रपटसृष्टीत येताना ते सर्व गोष्टींची तयारी करून येतात. त्यांना काय करायचे आहे हे माहिती असते. सईसुद्धा अशीच तयारी करून आली आहे. चित्रीकरण करताना मला तिला काहीच गोष्टी सांगाव्या लागल्या नाही. तिला पाहून मला माझे पदार्पणातील दिवस आठवल्याचेही सोनाक्षीने सांगितले. मी २३ वर्षांची असताना ‘दबंग’मधून या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. खरं तर मी फॅशन डिझाईनिंगचं शिक्षण पूर्ण के लं, अभिनयात उतरण्याबद्दल मी कधीच ठरवलं नव्हतं. मात्र एक दिवस सलमान, अरबाझ आणि अभिनव कश्यप माझ्या घरी आले. त्यांनी आईवडिलांबरोबर चर्चा केली आणि मी यात भूमिका करणार असल्याचे सांगितले. ‘दबंग’नंतर मात्र जसजसे वेगळे चित्रपट येत गेले, वेगळ्या भूमिका करत गेले तसं हे क्षेत्र आवडायला लागलं, असं सोनाक्षी म्हणते.

सलमानबरोबर तिसऱ्यांदा काम करण्याचा सोनाक्षीचा अनुभव वेगळा होता. त्याच्याबरोबर कितीही वेळा काम केलं तरी वेगळं वाटत नाही, कारण सलमान आपल्या सहकलाकारांना घरातील सदस्याप्रमाणे वागणूक देतो. सलमान खानचे माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असून पदार्पणातच त्याच्यासोबत काम करायला मिळणे ही एखाद्या कलाकारासाठी मोठी गोष्ट असल्याचे ती सांगते. सलमानकडून खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज यशाच्या शिखरावर असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. एक कलाकार म्हणून भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी त्यानेही मेहनत घेतल्याने भाईचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे सोनाक्षीने सांगितले.

‘दबंग’ चित्रपटाचे प्रमुख वैशिष्टय़ असे आहे की ‘धमाल,’  ‘गोलमाल,’  ‘हाऊसफुल’ या चित्रपटांच्या भागात अनेक कलाकार बदलले, परंतु ‘दबंग’मध्ये चुलबुल पांडे आणि रज्जोची भूमिका करणारे कलाकार एकच आहेत. त्यामुळे मी आणि सलमान खान ऐवजी प्रेक्षक अन्य कोणाला भूमिकेत पाहूच शकत नाहीत. एका काळानंतर माझे रज्जोशी नाते निर्माण झाले आहे. रज्जो ही उत्कृष्ट पत्नी असून चुलबुलने चांगलं काम केल्यास त्याची प्रशंसाही करते. तसंच चुकत असेल तर कान पकडायलाही क मी करत नाही. दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. ‘दबंग’च्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तसाच तिसरा चित्रपटही तिकीटबारीवर यशस्वी ठरेल, असे सोनाक्षीला वाटते. ‘दबंग’ हा चित्रपट आयटम सॉंग्ससाठी प्रसिद्ध आहे. पहिल्या भागात मलायका खानचे ‘मुन्नी बदनाम’, दुसऱ्या भागातील करिनाचे ‘फेविकॉल से’ ही गाणी अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहेत. यावेळी सलमानचेच ‘मुन्ना बदनाम’ गाणेही लोकप्रिय होईल, असे तिने सांगितले. राजकुमार हिरानी, रोहित शेट्टी यांच्याबरोबर काम करण्याचे सोनाक्षीचे स्वप्न आहे. ‘रावडी राठोड,’  ‘लूटेरा’,  ‘हॉलिडे’,  ‘अकिरा’,  ‘तेवर’ या चित्रपटागणिक माझ्या अभिनयात आणि काम करण्याच्या शैलीत बदल झालेला जाणवतो. फक्त शत्रुघ्न सिन्हांची मुलगी म्हणून नाही तर अभिनयाच्या जोरावर निर्माते-दिग्दर्शक चित्रपटासाठी माझ्या नावाचा विचार करायला लागले आहेत. हेच माझे सर्वात मोठे यश मानते. प्रत्येक चित्रपटाला मी पहिल्या चित्रपटाप्रमाणे पाहाते. त्यामुळे मी साकारलेल्या २५ चित्रपटांतील माझी आवडती भूमिका कोणती असे विचारल्यास सर्व असेच उत्तर मी देईन. ‘खानदानी शफाखाना’मधील बबिता बेदी, ‘कलंक’मधील सत्या चौधरी, ‘लालकप्तान’मधील नूर बाई या भूमिकांनी मला खूप काही शिकवले. याचा मला दैनंदिन जीवनातही उपयोग होतो, असे ती सांगते.

चित्रपट निर्मितीसाठी सर्व जण मेहनत घेत असतात. दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ याचबरोबर सेटवरील स्पॉटबॉयचे कामही तेवढेच महत्त्वाचे असते, त्यामुळे सगळ्यांशी मिळून-मिसळून वागण्यावर भर देणारी सोनाक्षी ऐतिहासिक, चरित्रात्मक तसेच खेळावर आधारित चित्रपट करण्याची इच्छा मनी बाळगून आहे. सध्या ती १९७०च्या स्वातंत्र्य लढय़ात शहीद झालेल्या भूजच्या सुंदरबन जेठा मधारपारिया यांची भूमिका साकारते आहे. चोवीस तासांत त्यांनी विमानांसाठी धावपट्टी तयार केली होती. त्यांची भूमिका साकारायला मजा येत असल्याचेही तिने सांगितले.

चित्रपटाच्या कथानकाला पुढे नेण्यासाठी काही पात्रांचा समावेश करण्यात येतो, तर काही पात्रे वगळली जातात. ‘दबंग’च्या तिन्ही भागातील खलनायकही वेगळे आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या रूपात दाक्षिणात्य कलाकार सुदीप संजीव काम करत आहेत. हा चित्रपट वेगवेगळी शैली असणाऱ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला आहे. पहिला अभिनव कश्यपने, दुसरा अरबाझ खानने, तर आताचा प्रभुदेवाने दिग्दर्शित केला आहे, याक डे तिने लक्ष वेधले. काही पात्रे सोडल्यास बाकी टीमही सारखीच असल्याने काम करताना अडचण येत नाही, असे ती म्हणते.

सोनाक्षीसाठी खाणे हा तिचा जीव की प्राण आहे. पदार्पणातच तिला स्थूलतेबद्दल टीके चा सामना करावा लागला होता. मात्र, नियमित व्यायाम, चौकस आहाराच्या जोरावर मी वजन कमी केले. माझ्यासाठी वजन प्रमाणात ठेवणे हे आव्हान आहे, कारण समोर आवडता खाद्यपदार्थ असल्यास मला खाण्याची इच्छा होते. परंतु अभिनयाच्या क्षेत्रात असल्याने जिभेवर नियंत्रण ठेवावे लागते. आठवडय़ातील पाच दिवस जिममध्ये घाम गाळल्यानंतर एक दिवस मी मनाप्रमाणे खाते, असेही सोनाक्षी म्हणते.सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म तेजीत आहे. टेलीव्हिजनवरील मालिकांबरोबरच ओटीटीवरील वेबसीरिजही मोठय़ा प्रमाणावर पाहिल्या  जात आहेत. ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’, ‘झी ५’  आणि ‘वूट’ यावर नवीन आशयाच्या वेब सीरिज आणि चित्रपट येत आहेत. यामुळे प्रेक्षकांना जगभरातील उत्तमोत्तम सिनेमा एका क्लिकवर पाहण्यास मिळत आहेत. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून सर्वोत्कृष्ट आशय प्रेक्षकांना पाहता येईल. मी कामादरम्यान फावल्या वेळात तसेच, घरी असताना वेब सीरिज पाहते. आतापर्यंत ‘फॅमिली मॅन’,  ‘सॅक्रेड गेम्स’, ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मिर्झापूर’ या वेबसीरिज पाहिल्या आहेत. एखादे चांगले कथानक असल्यास मला वेब सीरिज करायला आवडेल, असेही सोनाक्षीने सांगितले. सध्या ही दबंग गर्ल  ‘भूज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रत्येक कलाकारांच्या मुला-मुलीचे आपल्या पालकांसोबत काम करण्याचे स्वप्न असते.  मलाही वडिलांबरोबर म्हणजेच शत्रुघ्न सिन्हांबरोबर पडद्यावर काम करण्याची इच्छा असून बापलेकीचेच नाते रंगवायला आवडेल. कारण इतर कोणत्याही नात्यांपेक्षा हे नाते पडद्यावर सहजपणे साकारले जाईल. अर्थात उत्तम कथेबरोबर मला आणि वडिलांना दोघांनाही योग्य भूमिका असतील, तरच मी काम करेन. माझ्यासाठी आईवडिलांचा शब्द अंतिम असतो. चित्रपटाविषयी घरात नेहमीच चर्चा होते. वडिलांना चित्रपटसृष्टीतील खाचखळग्यांची कल्पना असल्याने त्यांच्या संमतीशिवाय मी पुढे जात नाही.

– सोनाक्षी सिन्हा