अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींसोबतच तेच कुटुंबीयदेखील चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सुहाना खानची मामेबहीण चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण चर्चेचा विषय ठरत आहे. हृतिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या बहिणीचा पश्मिना रोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे पश्मिना चर्चेत आली आहे.
पश्मिना रोशन ही हृतिकची चुलत बहीण असून तिच्या वाढदिवसानिमित्त हृतिकने तिचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच तिच्यासाठी खास पोस्टदेखील लिहिली आहे.
पश्मिना ‘बाजीराव- मस्तानी’ या चित्रपटातील मोहे रंग दो लाल या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर ताल धरताना पश्मिनाची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव हे वाखाणण्याजोगे आहेत. त्यामुळे सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चा विषय ठरत आहे. तू खरंच एक स्टार आहेस पश्मिना. मग ते ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन. अशीच आनंदात राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, अशी कॅप्शन देत हृतिकने पश्मिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, हृतिकने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. या व्हिडीओवर सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा तुफान पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे.