स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर मनसेनंही विरोध करत संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. या वादानंतर आता तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. महाराजांचा मी आदर करते आणि त्या व्हिडीओबद्दल मी मनापासून माफी मागते. तो व्हिडीओ हटवण्यात आला आहे’, असं ट्विट जोशुआने केलं आहे.

काय आहे प्रकरण ?

उपहासात्मक विनोद करण्याच्या नादात अग्रिमाने, “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा” असं म्हटलं. यापुढे तिने क्वोरावर या स्मारकाबद्दल काय काय लिहिलं होतं असं सांगताना, “मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असं अग्रिमा म्हणाली.

अग्रिमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे.