दिल्ली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्याची विटंबना करणं हे निंदनीय आहे’, असं म्हणत अभिनेता सुबोध भावेने या घटनेचा निषेध नोंदविला आहे. दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अक्षय लकरा यांनी गुरूवारी कथितरित्या काळे फासल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्व स्तरांमधून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

“स्वा.सावरकरांचे विचार पटायला हवेत किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे,पण म्हणून त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्याची विटंबना करणं हे निंदनीय आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांबद्दल नितांत आदर माझ्या मनात आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो”, असं म्हणतं सुबोधने या घटनेचा निषेध केला आहे.

दरम्यान, सुभाषचंद्र बोस व भगतसिंह यांच्याबरोबर एकाच जागी सावरकरांचा पुतळा नाही बसवला जाऊ शकत, असं म्हणत काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना NSUIने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.