एखादी भूमिका एखाद्या कलावंताची कायमची ओळख बनून जाते. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच साईबाबांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधून अभिनय करूनही साईबाबा म्हटले की चटकन सुधीर दळवी हेच नाव लोकांसमोर येते. ‘शिर्डी के साईबाबा’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटानंतर इतक्या वर्षांनी सुधीर दळवी ‘मेरे साई राम’ या नव्या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा साईबाबांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
एसआरजी फिल्म अॅण्ड व्हिडीओ या बॅनरचा सुजीत घोष व अरुंधती घोष यांची निर्मिती असलेला ‘मेरे साई राम’ हा हिंदी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नवीन जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात स्मिता डोंगरे, राहुल बारापात्रे, पियु जाना, मुकुल नाग, सरप्रित सिंग, धनंजय चौधरी आदी कलावंत यात भूमिका साकारत आहेत.
सुजीत आणि शकील अहमद यांनी पटकथा-संवाद लिहिलेला हा चित्रपट म्हणजे साईबाबांचा चरित्रपट नाही. साध्या-सरळ कथानकाद्वारे भक्तांची साईबाबांवरील श्रद्धा दाखविण्याचा प्रयत्न केला असून काहीशा वेगळ्या अंगाने साईबाबांची महती सांगण्यास वाव मिळाला म्हणूनच आपण पुन्हा एकदा साईबाबांची भूमिका स्वीकारली, असे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी सांगितले.