‘शाळा’, ‘आजोबा’, ‘फुंतरू’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सुजय डहाकेचा कुस्तीवर आधारित ‘केसरी – saffron’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत लहानाचा मोठा झालेला विराट मडके या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून विराट पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विराट या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

मुळचा कोल्हापूरचा असलेल्या विराटने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. मात्र कुस्तीच्या प्रेमापोटी त्याने थेट आखाडा गाठला. त्यानंतर आता तो कलाविश्वामध्ये पदार्पण करत आहे. विराट सध्या ‘हिंद केसरी’, ‘महान भारत केसरी’ रोहित पटेल व ‘महाराष्ट्र केसरी’, ‘रुस्तूम – ए – हिंद’ किताब पटकावलेल्या अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे.

“मी कोल्हापूरचा असलो तरी २००५ पासून पुण्यात आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना मी प्रायोगिक रंगभूमीवर पाऊन ठेवले. आजपर्यंत मी अनेक एकांकिकांमध्ये कामे केली आहेत. लहानपणासून मला अभिनयाबरोबरच खेळाची आवड आहे, विविध प्रकारच्या खेळात मी शाळा, महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे मी कधी जिमला गेलो नसलो तरी माझी शरीरयष्टी उत्तम राहिली आहे. ‘केसरी’ची तयारी करताना मला खेळाडू असण्याचा मोठा फायदा झाला. कुस्तीच्या आखाड्यात पहिल्यांदा उतरणारी मुले कमी वयाची असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात लवचिकता निर्माण होते, ती चपळता मिळवणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या काळात रोहित पटेल आणि नंतर अमोल बुचडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला प्रशिक्षण दिले, यामुळेच मी कुस्तीगीर दिसेल असा झालो आहे. अलीकडे अनेकदा बॉडी बिल्डिंग करणारी मुले इंजेक्शन किंवा इतर पर्याय निवडतात मात्र मी अशा कोणत्याही मार्गाचा वापर न करता फक्त आखाड्यातील कसरत आणि पौष्टिक आहार यावर लक्षकेंद्रीत केले होते”, असे विराटने सांगितले.

‘केसरी – saffron’ या चित्रपटात एका सामान्य घरातील कुस्तीगिराच्या जिद्दीचा प्रवास मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विराट मडके मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण क रणार आहे. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कुस्तीगिरांसाठी कसरत आणि खुराकासाठी लागणारा खर्च सरकार करत होते. परंतु या खेळांना आता नावापुरता राजाश्रय उरला आहे. कुस्ती रांगडा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य घरातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि ते पूर्णत्वास कसे नेतो याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

वाचा : आलिया आर्थिक गुंतवणूक कशात करते माहितीये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रवीण तरडे, नंदेश उमप या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे संकलन दिग्दर्शन सुजय डहाकेचे असून लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत दिलेल्या या चित्रपटाला क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय टेम्भूर्णी यांच्या गीते केली आहेत.