‘कुटुंब रंगलंय अभिनयात’ अशी काहीशी अवस्था पिळगावकर कुटुंबियांची आहे. अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याप्रमाणेच सुप्रिया पिळगावकर यांनीही गेल्या काही वर्षांत हिंदीत छोटय़ा पडद्यावर आपले स्थान कायम केले आहे. अजूनही समजूतदार आईच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा त्यांचा विचार केला जातो. अशा भूमिकाही करायला हरकत नाही मात्र कुठेतरी आपल्या भूमिकेला, व्यक्तिरेखेला वेगवेगळे कंगोरे असले तर काम करायला जास्त आवडेल, असे त्या म्हणतात. सध्या शाहरूखच्या ‘फॅन’ चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणारी आपली मुलगी श्रिया हिच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया पिळगावकर सध्या सोनी टीव्हीवरच्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमोमधून जाणवते ते मुलगा आणि आईचे घट्ट नाते आणि आईचे मन दुखवू नये म्हणून प्रेयसीपासून लांब राहणारा मुलगा यात दिसतो. ‘हो..मला स्वत:ला या मालिकेकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणजे या मालिकेत जी आई तुम्हाला दिसते ती प्रेमळ आहे. तिने आणि तिच्या मुलाने एक काळ मोठा संघर्ष करून आजचे स्थैर्य कमावले आहे. साहजिकच या दोघांच्या नात्यात आत्मिक संबंध जास्त आहे. त्यामुळे या दोघांमध्ये जेव्हा मुलाच्या प्रेयसीच्या निमित्ताने तिसरी व्यक्ती येऊ घालते तेव्हा आईच्या मनातली असुरक्षिततेची भावना डोकं वर काढते. आपल्या मुलाला कोणीतरी आपल्याापासून हिरावून घेणार आहे ही भावना तिच्या मनात असते आणि त्याचे पडसाद तिच्या वागण्यात उमटत राहते. एक चांगली आई ते एक चांगली सासू बनण्यापर्यंतचा हा प्रवास या मालिकेतून उलगडणार आहे, असे सुप्रिया यांनी सांगितले. मात्र, हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्रींना आपल्या भूमिकांबद्दल जी भीती वाटत असते तीच सुप्रिया यांनाही सतावते आहे. बऱ्याचदा मालिकांच्या संकल्पना खूप चांगल्या असतात. पण तुमच्या कथेत जे आहे ते तुम्ही पडद्यावर कसे आणता? तुमचा स्क्रीन प्ले कसा आहे, यावर मालिकेचे यश अवलंबून असते. आणि कित्येकदा मालिका इथेच मार खातात, असे त्या म्हणतात. कलाकार म्हणून आमच्या हातात फार थोडय़ा गोष्टी असतात. त्यामुळे मालिका निवडताना कितीही काळजी घेतली तरी आम्हाला अपेक्षित असलेलंच पडद्यावर दिसेलच याची खात्री देता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ ही मालिका मात्र वेगळी ठरेल आणि लोकांना आवडेल, असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. एक कलाकार म्हणून मी मालिकेकडून अपेक्षा ठेवत नाही. कारण, आपण भूमिकेविषयी कितीही वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले तरी त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात. तुमची भूमिका लोकप्रिय झाली तर फार अडचण येत नाही. ‘ससुराल गेंदाफूल’ केली होती त्या मालिके च्या वेळी जशा गोष्टी मनाप्रमाणे जुळून आल्या होत्या तसेच या मालिकेबाबतीतही मला वाटते आहे.  ही मालिको मनासारखी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपल्याला कायम अभिनयातच रस होता त्यामुळे अभिनेत्री म्हणूनच आपण समाधानी असून आणखी निर्माती, दिग्दर्शक म्हणून विस्तार करायचा मानस नाही. श्रियाने आपल्याला घेऊन चित्रपट दिग्दर्शन करायचा निर्धार केला असल्याचे आधीच सांगितले आहे. तो योग कधी येतो आहे, याची वाट पाहते आहे. मात्र श्रियाबरोबर एकत्र काम करायची इच्छा आहे. एकेकाळी खूप विनोदी मालिकांमधूनही मी काम केले आहे. मात्र माझ्याबाबतीत विनोदी भूमिकांचा कोणी विचारच करत नाही.  आता मला  विनोदी भूमिका ही ‘ब्लॅक कॉमेडी’ धाटणीची आणि नाटकातूनच करायला आवडेल.

सुप्रिया पिळगावकर