दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फेक व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप बिहारमधल्या एका युट्युबरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास केला असता संबंधित व्यक्तीने गेल्या चार महिन्यांत युट्यूबवर सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल १५ लाख रुपयांवर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. राशिद सिद्दिकी असं या आरोपीचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.

राशिद हा इंजिनीअर असून त्याने ‘एफएफ न्यूज’ (FF News) या नावाने युट्युब चॅनल सुरू केलं. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविरोधात राशिदने पोस्ट केलेल्या व्हिडीओला लाखोंहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

सुरुवातीला सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अपलोड केलेल्या व्हिडीओ अधिकाधिक व्ह्यूज मिळत गेल्याने त्याने सप्टेंबर महिन्यात साडेसहा लाखांची कमाई केली होती. त्यानंतर त्याच्या युट्युब चॅनलचे सबस्क्राइबर्ससुद्धा वाढू लागले होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याचे दोन लाख सबस्क्राइबर्स होते तर आता हा आकडा ३.७० लाखांवर गेला आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाविषयी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये कुतुहल होतं आणि याचाच वापर राशिदकडून पैसे कमावण्यासाठी केला गेला, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे इथल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करत आहे.