अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणातील पहिल्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘केदारनाथ’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये सारा अली खानसोबत सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. बऱ्याच अडचणींवर मात केल्यानंतर अखेर साराच्या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘केदारनाथ’ चित्रपटात सारा आणि सुशांतची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचा संदर्भ या प्रेमकथेला देण्यात आला आहे. ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. यामध्ये सुशांत मंसूर नावाच्या पिट्ठूची तर सारा मुक्कू नामक पर्यटकाची भूमिका साकारत आहे. निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यात काही वाद झाले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. शूटिंग सुरू असतानाच निर्माती प्रेरणाने माघार घेतल्याने अभिषेकसमोर पेच उभा राहिला. अखेर रॉनी स्क्रूवालाने याच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली.
पाहा ट्रेलर
जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता प्रेक्षकांच्या नजरा सारा अली खानकडे वळल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जान्हवी आणि साराला मिळालेल्या यशाची तुलना होणार हे नक्की. तेव्हा आता ‘केदारनाथ’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 1:04 pm