अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता चार महिने उलटून गेले आहेत. ईडी, सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर यावं यासाठी सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने ‘जस्टिस फॉर सुशांत’ असं एक कॅम्पेनच सुरु केलं आहे. या ऑनलाईन कॅम्पेनमध्ये जगभरातील सुशांत चाहत्यांनी भाग घेतला. पण लक्षवेधी बाब म्हणजे यापुढे श्वेता कदाचित कुठलीही ऑनलाईन पोस्ट करणार नाही. सुशांत प्रकरणातील चौकशीवर नाराज असलेल्या श्वेताने आपलं ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं आहे. श्वेताच्या या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ती लवकरच या निर्णयामागचं कारण अधिकृतरित्या सांगेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आले. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.