भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर भाष्य करणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे सुशांतने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या धोनीच्या भूमिकेला अनेकांनीच पसंत केले होते. या चित्रपटासाठी सुशांतने फारच मेहनत घेतली होती. सुशांतने घेतलेली ही मेहनत आणि त्याच्या अभिनयाची खुद्द अमिताभ बच्चन यांनीही एका कार्यक्रमात प्रशंसा केली होती. ‘काय पो चे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘ब्योमकेश बक्शी’ या चित्रपटांतून झळकलेल्या सुशांत सिंग राजपूतच्या कारकिर्दीला ‘एम. एस. धोनी..’ या चित्रपटाने कलाटणी दिली होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे सुशांतच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये एका खेळाडूच्या भूमिकेला न्याय देणारा सुशांत सिंग राजपूत त्याच्या आगामी चित्रपटातही एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅरालिम्पिक पदक विजेता खेळाडू मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपटात सुशांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला अद्यापही सुरुवात झालेली नाही, पण या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांतचे नाव जवळपास निश्चितच करण्यात आले आहे. सध्या सुशांत ‘राबता’ आणि ‘पानी’ या चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.

या चित्रपटासंबंधी बोलताना ‘मी जेव्हा या चित्रपटाची कथा ऐकली त्याक्षणी लगेचच मी चित्रपटासाठी होकार दिला. ती प्रोत्साहनपर कथा ऐकताच इतर कोणताही विचार न करता मी हा चित्रपट करु इच्छित होतो. धोनीची भूमिका साकारल्यानंतर आता मी पेटकरची भूमिका साकारण्यासाठी तयार झालो आहे. अपंगत्वावर मात करत त्यांनी कधीही या गोष्टीला आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही’, असे सुशांत म्हणाल्याचे वृत्त ‘द एशियन एज’ ने प्रसिद्ध केले होते.

वाचा: सुशांत-रणवीरमध्ये ‘ऑल इज नॉट वेल..’ 

काही दिवसांपूर्वीच पॅरालिम्पिक खेळांमधील सुवर्णपदक विजेता खेळाडू मरियप्पनच्या जीनवावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने अनेकांचेच लक्ष वेधले होते. मरियप्पनचे यश देशासाठी महत्त्वाचे आहेच. पण, पॅरालिम्पिक खेळांमध्ये देशासाठी सर्वप्रथम वैयक्तिक पातळीवर सुवर्णपदक मिळविणारा खेळाडू म्हणजे मुरलीकांत पेटकर. त्यामुळे मरियप्पन नंतर आता आणखी एका पॅरालिम्पिक खेळाडूच्या जीवनावर चित्रपट बनणार असल्यामुळे अनेकांनाच त्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.