बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परिणामी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी त्याची करोना चाचणी देखील केली गेली. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. त्याने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

अवश्य पाहा – “तुम्ही सगळे खोटारडे आहात, इथं कोणी कोणाला मदत करत नाही”; अभिनेत्याने बॉलिवूडला दाखवला आरसा

सध्या संपुर्ण देश करोनाग्रस्त वातावरणात आहे. परिणामी अंत्यसंस्कारासाठी मोजक्याच लोकांना उपस्थित राहता येणार आहे. यामध्ये सुशांतचे वडील आणि निवडक नातेवाईकांचा समावेश असेल. सुशांतचे पार्थिव हवाबंद पिशवीतून कुटुंबियांकडे सुपुर्त केलं जाईल. अंत्यसंस्कार करण्याआधी सुशांतच्या पार्थिवाची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास सुशांतचा एक मित्र आणि त्याच्या तीन नोकरांना क्वारंटाईन केलं जाईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास सुशांतसोबत त्याच्या वांद्रे येथील घरात राहणाऱ्या मित्राला तसेच सुशांतच्या नोकरांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता येणार आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.