मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावला तो शूर, पराक्रमी, रणधुरंधर पेशव्यांनी. रणांगणामध्ये युध्द जिंकण्याचा निश्चय, शौर्य, उत्तम रणनीती यामुळे पेशव्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत मराठा साम्राज्य चोहीकडे पसरवले. या सगळ्यांमध्ये पेशवाईचा आधारस्तंभ ठरल्या, घरातील ‘स्त्रिया’. स्त्रियांचे पेशव्यांच्या कारभारात, राजकारणात, निर्णयात प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या नेहमीच सहभाग असे. महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, प्रत्येक यशस्वी थोर पुरुषामागे स्त्रीचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पेशव्यांच्या काळात एक पतिव्रता, एकनिष्ठ  स्वामिनी होऊन गेली ती म्हणजेच माधवरावांची रमा… त्या काळात पेशव्यांचा ‘मानबिंदू’ म्हणून ओळखला जाणारा शनिवारवाडा साक्षी ठरला एका विलक्षण प्रेमकहाणीचा… माधव आणि रमाचे लग्न संपूर्ण पेशवाईला एक वेगळी कलाटणी देणारे ठरले. सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थानं, राजकारणी डावपेच यामध्ये रमा माधवरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.

रमा एका सामान्य घरात वाढलेली हुशार, निरागस  मुलगी, जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले पण या भरजरी वस्त्रांसोबत येणार्‍या किंबहुना त्याहून अधिक कठीण जबाबदार्‍यांपासून ती अनभिज्ञ होती. पानिपतनंतर पेशवाईला पुन्हा एकदा सुवर्ण झळाळी देण्याची जबाबदारी  माधवरावांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली. माधवराव अत्यंत शिस्तप्रिय, करारी, निग्रही असे पेशवा होते, ज्यांनी निजाम – हैदरला पायबंद केला. माधवरावांशी विवाह हा रमासाठी एक अपघात होता. एकीकडे माधवरावांचा विश्वास मिळवणे आणि दुसरीकडे अत्यंत कठोर, धोरणी गोपिकाबाई यांच्याशी जुळवून घेणे अशी आव्हानं छोट्या रमासमोर होती. शनिवारवाड्यामध्ये प्रेमळ पार्वतीबाईंचा रमाला कायम आधार वाटला तर धूर्त, कावेबाज आनंदीबाई देखील शनिवारवाड्यात होत्याच. या सगळ्यामध्ये रमा – माधवच्या सहजीवनाचा नवा प्रवास सुरू झाला. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन असणार आहेत.

मालिकेचे लेखक – दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, ”एका सामान्य मुलीचा राजकन्या बनण्यापर्यंतचा प्रवास ही गोष्ट कलर्स मराठीवर दाखविण्याची संधी मला मिळाली याचा अत्यंत आनंद होत आहे. पेशवाईचा काळ आणि त्याचं देखणं रूप या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.”

गोपिकाबाईंच्या भूमिका ऐश्वर्या नारकर साकारणार असून त्या या भूमिकेबद्दल म्हणाल्या, स्वामिनी मालिकेमध्ये मी गोपिकाबाईंची भूमिका साकारणार आहे. गोपिकाबाई त्यांच्या निर्णयावर कायम ठाम राहिल्या, त्या खूप हुशार होत्या, घरातील राजकारण त्यांनी फिरत ठेवले. पेशव्यांच्या घरातील राजकारणाचे बाहेरच्या राजकारणावर देखील पडसाद उमटत होते. पेशवाई  आपल्या नवर्‍याजवळच टिकून रहावी वा ती आपल्या मुलालाच मिळावी हा त्यांचा अट्टाहास होता. पेशवाई टिकवण्यासाठी पेशव्यांनी जी थोर कामगिरी केली ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु त्यावेळी चुलीजवळचं राजकारण कसं होतं तसेच गोपिकाबाईंच्या रमासोबतच्या नात्याचे विविध पैलू, माधवरावांशी असलेले नाते हे मालिकेद्वारे बघायला मिळणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रमा – माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी  केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे. स्त्रीची सत्वपरीक्षा ही तिच्या जन्मापासूनच सुरू होते असे म्हणतात. रमाच्या बाबतीत देखील असेच घडले. गृहकलहाचा अग्नी भडकू न देता ओंजळीत निखारे घेऊन रमाबाईंनी माधवरावांना साथ दिली. या दोघांचा अद्भुत प्रवास ९ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.