बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘रसभरी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजवर सातत्याने टीका होत आहे. काही जण पटकथेमुळे नाराज आहेत. तर काही जण अश्लिल दृश्यांमुळे संतप्त आहेत. अशीच काहीशी टीका अभिनेता सिद्धार्थ यादववर केली जात आहे. ‘रसभरी’मध्ये स्वरासोबत झळकलेल्या सिद्धार्थला राष्ट्रीय स्वराज्य संघाचा कार्यकर्ता म्हटलं जात आहे. मुस्लीम समुदायाला धमकावल्याचे आरोप त्याच्यावर केले जात आहे. मात्र या आरोपांवर स्वराने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

“सिद्धार्थ यादव नावाच्या या अभिनेत्याने रसभरीमध्ये स्वरा भास्करसोबत काम केले आहे. हा व्यक्ती RSS चा कार्यकर्ता आहे. त्याने करोनाच्या नावाखाली मुस्लीम समुदायाला धमकावले होते. आपण अशा व्यक्तीसोबत कशा काय काम करु शकता?” अशा आशयाचे ट्विट स्वरा भास्करसाठी एका नेटकऱ्याने केले होते.

नेटकऱ्याच्या या प्रश्नावर स्वराने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “रसभरी या वेब सीरिजचं चित्रीकरण २०१९मध्ये झालं होतं. त्या ट्विटची तारीख पाहा. एका शूटमध्ये अनेक कलाकार असतात जे लहान मोठ्या भूमिका साकारतात. चित्रीकरणादरम्यान गर्दीत उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ट्विट तपासून पाहणे शक्य नाही. त्यामुळे सीरिजवर बहिष्कार करण्यापेक्षा समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांना समजावणे जास्त चांगला उपाय आहे.” स्वरा भास्करने अशा आशयाचे ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.