निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ कंपनीला गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘गोव्यात प्रत्येकाचं स्वागत आहे. इथे शूट करा पण त्यासोबत केलेला कचरा इथून घेऊन जा’, अशा शब्दांत गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी करण जोहरला दम दिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत धर्मा प्रॉडक्शन्सवर टीका केली होती. करण जोहरच्या टीमने गोव्यात शूटिंगच्या ठिकाणी कचरा टाकल्याचं तिने निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर मायकल लोबो यांनी या प्रकरणात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहेत. “गोवा हे अत्यंत सुंदर राज्य आहे आणि इथे अनेकजण शूटिंगसाठी येतात. प्रत्येकाचं इथे स्वागतच आहे, पण इथे कचरा करू नका. केला तरी तो जाताना सोबत घेऊन जा. धर्मा प्रॉडक्शन्सने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करावी,” असं ते म्हणाले.

गोव्यातील एका गावात करण जोहरच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगनंतर त्याठिकाणी प्लास्टिकचे चमचे, प्लेट्स, इतर कचरा तसेच फेकून देण्यात आले. शूटिंगनंतर केलेला कचरा धर्मा प्रॉडक्शन्सकडून साफ करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.