निलेश अडसूळ

कामावर असलेली निष्ठा आणि मेहनत यांच्या जोरावर मिळालेल्या संधीचे सोने करत ज्याने घराघरात आणि मनामनात खंडोबाचा भंडारा पोहोचवला तो कलाकार म्हणजे अभिनेता देवदत नागे. फॅशन शोच्या रॅम्पहून चालत थेट मालिका जगतात प्रवेश करणारा देवदत्त म्हणतो, ‘आज मला मिळालेली ओळख ही केवळ मालिकांमुळे आहे. मग तो देवयानी मालिकेतील आडदांड बिनडोक असो किंवा जय मल्हार मालिकेतील खंडोबा. भविष्यात अजून अनेक संधी येतील, परंतु मागे वळून पाहताना मालिकांचे ऋण कधीही विसरणार नाही.’

आपल्या कारकिर्दीची सुरुवात विशद करताना देवदत्त सांगतो, काही काळ फॅशन शो केले, पण त्याच वेळी माझे गुरू प्रसाद पंडित यांनी ‘फॅशन शो करून केवळ दृक्माध्यमातून समोर येण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमाचा विचार कर’ असा सल्ला दिला. त्यावेळी दूरदर्शनसाठी करण्यात आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकात छोटीशी भूमिका साकारण्याची त्यांनी मला संधी दिली. हे नाटक टीव्हीवर प्रसारित झाले तेव्हा पहिल्यांदा मी स्वत:ला स्टेजवर काम करताना पाहिले. त्यानंतर त्यांच्याच एका नाटकात काम करत असताना मित्राने मला मालिकेसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला आणि ‘मी मराठी’ वाहिनीवरील ‘मृत्युंजय’ या मालिकेसाठी मी पहिलं ऑडिशन दिलं. आनंदाची बाब म्हणजे ऑडिशननंतर ‘तू मला कर्णाच्या भूमिकेसाठी हवा आहे’ असं त्यावेळी मालिकेचे दिग्दर्शक संजीव कोलते म्हणाले. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य नसल्याने त्यांनी मला दुर्योधनाची भूमिका दिली आणि मालिकेचा प्रवास तिथून सुरू झाला. त्या नंतर ‘ई टीव्ही’ मराठीवरील ‘बाजीराव मस्तानी’, ‘कालाय तस्मै नम:’ या मालिका केल्या. पुढे तो म्हणतो, कॅलर्स हिंदीवरील ‘लागी तुझसे लगन’ या मालिकेत मला फक्त तीन भागांसाठी बोलावलं होतं, पण माझं काम पाहून त्यांनी माझी भूमिका सहा महिने चालवली. परंतु ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गाजलेल्या देवयानी मालिकेतील ‘सम्राटराव ऊर्फ आडदांड बिनडोक’ या पात्राने मला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’ मालिकेत मला मुख्य भूमिको करण्याची संधी मिळाली आणि खंडोबाच्या भूमिकेने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘आधी मी केवळ लोकांच्या घराघरात पोहोचलो होतो, परंतु या मालिकेने मला प्रेक्षकांच्या मनात अढळस्थान मिळवून दिले’ असेही तो सांगतो.

मूळचा अलिबागचा असणाऱ्या देवदत्तला शरीर कमावण्याची आवड तशी पहिल्यापासूनच होती. आजही त्याची प्रकृती हीच त्याची ओळख आहे. त्याविषयी तो सांगतो, लहानपणापासूनच सुपरमॅन, बॅटमॅन, हिमॅन हे माझ्या प्रेरणास्थानी होते, आजही आहेत. लहानपणी वाचलेली कॉमिक्स आजही जपून ठेवली आहेत. त्यामुळे आपणही अशीच तब्येत बनवायला हवी असे कायम वाटायचे. इयत्ता आठवीपासूनच मी व्यायाम सुरू केला. मला घडवण्यामध्ये पेणची हनुमान व्यायामशाळा आणि अलिबागची सार्वजनिक व्यायामशाळा या दोन वास्तूंचा मोठा वाटा आहे. आजही मी तिथे गेल्यावर माझे डोळे भरून येतात. कारण ज्यातून माझी सुरुवात झाली त्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि फॅशन शो या सगळ्यामागे केवळ माझं शरीर आणि ते घडवणाऱ्या या दोन व्यायामशाळा आहेत. तसेच ‘व्यायामासोबतच प्रत्येकाने निव्र्यसनी राहणं हेही खूप महत्त्वाचं आहे.’ असा सल्लाही देवदत्त देतो. आजही मध्यरात्री दोनला जरी चित्रीकरण थांबले तरी व्यायाम मात्र चुकत नाही. अगदी दौऱ्यावरही जाताना हॉटेल कसं आहे हे पाहण्यापेक्षा तिथे जिम आहे का, ती कशी आहे हे पाहून मी ठिकाण निवडतो.

आजवर साकारलेल्या भूमिकांच्या आठवणी जागवताना तो सांगतो, मी प्रत्येक भूमिकेवर तितकेच प्रेम केले. छोटी-मोठी असा भेद कधी केला नाही. विशेष म्हणजे आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेच्या काही आठवणी मी जवळ बाळगल्या आहेत. दुर्योधनची मिशी, सम्राटरावच्या अंगठय़ा, घडय़ाळ, खंडोबाचा पोशाख. मी प्रत्येक पात्राला मुख्य भूमिकेसारखाच न्याय दिला म्हणून त्या लोकांच्या लक्षात राहिल्या. अगदी आडदांड बिनडोक साकारताना लोकांना त्या आडदांड बिनडोकच्या बिनडोक असण्याची दया यायची. मला रस्त्यातही थांबवून लोक सांगायचे, ‘अहो जरा त्या आबासाहेबांचं ऐकत जा हो’. असाच अनुभव मला खंडोबा साकारताना आला. अनेक लोक मला खंडोबा समजूनच लीन व्हायचे. आजही लोक ‘खंडोबाचं नाव घेताना तुझा चेहरा समोर येतो’ असं आवर्जून सांगतात. विशेष म्हणजे लहान मुलांना सुपर हिरोप्रमाणे खंडोबाही त्यांचा सुपर हिरो वाटत असे. असे अनेक पालक येऊन सांगायचे. आम्हाला जेजुरीला घेऊन चला असा त्या मुलांचा हट्ट असायचा. त्याहूनही गंमत म्हणजे मी जेजुरीत नाही म्हटल्यावर ती मुलं मला भेटायला सेटवर यायची. त्यामुळे हे अनुभव कायम सोबत राहतील.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटात त्याने सूर्याजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. हिंदीतील अनुभव सांगताना तो म्हणाला, इतिहासाविषयी मला कायमच आदर आहे. परंतु तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी आणि माझा वाढदिवस योगयोगाने एकाच दिवशी येत असल्याने या चित्रपटाशी माझे नाते काहीसे वेगळे आहे. म्हणून या चित्रपटात अगदी द्वारपालाचीही भूमिका साकारण्याची माझी तयारी होती. परंतु माझी शरीरयष्टी आणि भूमिकेसाठी लागणारे कौशल्य पाहून दिग्दर्शक ओम राऊत यांनी मात्र मला ‘सूर्याजी मालुसरे’ साकारण्याची संधी दिली. त्यामुळे अमराठी प्रेक्षक वर्गही मला ओळखू लागला. या चित्रपटाच्या दरम्यान माझा छोटासा अपघात झाला, परंतु महाराजांसाठी काहीतरी करण्याची जिद्द मनात असल्याने कंबर कसून पुन्हा उभा राहिलो आणि चित्रीकरण पूर्ण केले. त्या दरम्यान घडलेला महत्त्वाचा किस्सा म्हणजे, अपघातानंतर चित्रपटातील साहाय्यकच नव्हे, तर खुद्द अजय देवगण, सैफ अली खान हे देखील येऊन माझी विचारपूस करायचे. तिथले व्यावसायिकता शिकण्यासारखी आहे, असेही तो सांगतो.

आजवर मी साकारलेली प्रत्येक भूमिका मला यश देऊन गेली. त्यामुळे काय हवं यापेक्षा मिळालेल्या भूमिकेत काय नवीन करता येईल याचा मी विचार करतो. कारण माझ्यासाठी ही शिकण्याची प्रक्रिया आहे. अभिनयाच्या क्षेत्रात अजून खूप काम करायचं आहे. अजून मी इयत्ता पहिलीतही नाही. आता कुठे माझ्या कारकिर्दीचे बालवर्ग सुरू झाले आहेत असेही तो नम्रपणे सांगतो. परंतु त्याच्या मते, सुपरहिरो हे त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने असाच एखादा सुपरहिरो साकारता आला तर तो त्याचा ‘ड्रीमरोल’ ठरेल.

डॉक्टर डॉन..

नुकतीच ‘डॉक्टर डॉन’ ही नवी मालिका ‘झी युवा’ या वाहिनीवर सुरू झाली आहे. या निमित्ताने देवदत्त एका आंतरराष्ट्रीय डॉनची भूमिका सकारात आहे. विशेष म्हणजे हा डॉन, डॉन असला तरी स्वभावाने मात्र चांगला आहे. लोकांना मदत करण्याची त्याला आवड आहे. या भूमिके विषयी तो सांगतो. या डॉनची मुलगी एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्यासाठी प्रवेश घेते. मुलीच्या काळजीने हाही त्या कॉलेजात दाखल होतो आणि स्वत:च त्या रुग्णालयाच्या डीनच्या प्रेमात पडतो. त्यामुळे डॉनचा थ्रील, मुलीबाबत असणारी काळजी, काहीसा विनोदी आणि लव्ह स्टोरी असं वेगळ समीकरण या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लाल रंग ‘एसटी’चा

देवदत्तच्या लाल रंगाच्या आवडीविषयी अनेकांना ठाऊक आहे. परंतु हा केवळ रंग नसून ती एक जाणीव असल्याचे तो सांगतो. त्याच्या मते, माझ्याकडे येणारी प्रत्येक नवी वस्तू लाल रंगाची असते. हा रंग मला कायमच ऊर्जेचा स्रोत वाटतो. परंतु त्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाले तर, ही एक जाणीव आहे. पाय जमिनीवर ठेवण्याची. माझ्या आयुष्यातला अर्ध्याहून अधिक प्रवास मी लाल रंगाच्या एसटीने केला आहे. मग ते ऑडिशनसाठी मुंबईमध्ये येणं असो किंवा काम मिळत नाही म्हणून दादरच्या एसटी थांब्यावर विचार करत बसणं असो. स्ट्रगलच्या काळात कायमच या एसटीने मला साथ दिली आहे. मुंबईतून दमून भागून जेव्हा अलिबागची एसटी पकडायचो तेव्हा कुशीत शिरल्यासारखं मी त्या सीटवर जाऊन झोपायचो. म्हणूनच पुढे जाताना कुठे तरी या प्रवासाची जाणीव मनात जिवंत ठेवणारा हा लाल रंग आहे.

अविस्मरणीय ‘जय मल्हार’

जय मल्हार हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय पर्व होते. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबावर आधारलेल्या या मालिकेत प्रेक्षकही मनोभावे विलीन झाले होते. त्यामुळे खंडोबाचा पोशाख अंगावर चढवताना एक वेगळी भावना मनात असायची. मालिकेत माझ्या कपाळी लावला जाणारा भंडारा हा रंग नसून थेट खंडोबाच्या शिवलिंगावरील भंडारा असायचा. इतरवेळी आठनंतरच्या मालिका प्राईम टाईमच्या समजल्या जातात, परंतु जय मल्हारच्या बाबतीत मात्र अगदी सातच्या काटय़ावर प्रेक्षक टीव्हीसमोर येऊन बसायचे. मला मिळालेल्या यशामागे या मालिकेचा खूप मोठा वाटा आहे. त्याची कृतज्ञता म्हणून आजही मी चंपाषष्ठीला जेजुरीत जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतो.