‘नागार्जुन- एक योद्धा’ या मालिकेतील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. तिचा कोब्रासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आता हे प्रकरण श्रुतीच्या चांगलेच अंगाशी आल्याचे दिसत आहे. बुधवारी सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये ती हातात कोब्रा पकडून दिसत होती. त्यामुळे काही प्राणीमित्र संघटनांनी वनविभागाकडे या अभिनेत्रीची तक्रार केली ज्यामुळे तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रुतीसह आणखी एक अभिनेत्री आणि मालिकेच्या दोन निर्मिती व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आल्याचे वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केले आहे. वन्यजीव कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबई विभागातील काही वन अधिकाऱ्यांनी प्राणीमित्रांच्या सांगण्यावरुन ही तक्रार दाखल केली आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ २०१६ मध्ये आलेल्या नागार्जुन एक योद्धा या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बनविण्यात आला होता, अशी माहिती सध्या समोर येत आहे. पण, या मालिकेच्या निर्मिती संस्थेच्या म्हणण्यानुसार स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने का कोब्रा बनविण्यात आला असून तो खरा साप नाहीये. पण, या प्रकरणाच्या तपासादरम्यान तो कोब्रा खरा असल्याचे उघड झाल्यामुळे आता श्रुती उल्फत चांगलीच पेचात सापडली आहे. सदर प्रकरणी कारवाई सुरु असतानाच चौकशीदरम्यान श्रुती, तिची सह अभिनेत्री आणि इतर दोन व्यक्तिंनी तो साप खरा असल्याचे स्वीकारल्यामुळे त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.