वेब सीरिजची वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक बॉलिवूड कलाकार आता वेब सीरिजकडे वळताना दिसत आहे. नेहा धुपिया, आर माधवन, राजकुमार राव, निमरत कौर, कलकी, नवाजुद्दिन, राधिका अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वेब सीरिजमध्ये काम केलं आहे किंवा करत आहेत. वेब सीरिजला मिळणारी वाढती पसंती लक्षात घेऊन आता अभिनेता सैफ अली खानदेखील वेब सीरिजकडे वळला आहे.

‘सेक्रेड गेम्स’ असं या वेब सीरिजचं नाव आहे. यात सैफ मुख्य भूमिकेत आहे. याचं चित्रकरण सुरू असून ‘नेटफिक्स’नं या सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. यात सैफ सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सैफ यात एका पंजाबी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकावर आधारीत ही वेब सीरीज आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप या वेबसीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. आठ भागांची ही सिरिज असणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’ मधून अनुराग कश्यप आणि सैफ अली खान पहिल्यांदाच वेब सीरिजच्या विश्वात आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वी सैफचा शेफ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे सैफच्या या नव्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून आता कसा प्रतिसाद मिळतो हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल.