आजारपण किंवा अन्य कारणांमुळे सुट्टी घेण्यासंदर्भात नियमावलीचा अभाव

भक्ती परब, मुंबई</strong>

मनोरंजन वाहिन्यांवर दैनंदिन मालिकांचे प्रसारण खंड न पडता सुरू असते. कधी मालिकेत निर्णायक वळण, तर कधी उत्कंठावर्धक भाग, तसेच रविवारचा एक तासाचा विशेष भाग असतो. अशा वेळी चित्रीकरण करताना कलाकारांवर ताण येतो, कधी नैसर्गिक संकटे, आजारपणेही येतात. या संदर्भात, एकच एक मार्गदर्शक नियमावली अद्यापही निर्मिती संस्थांकडे नाही. मात्र प्रसंगानुरूप कलाकारांशी बोलून, त्यांना कुठल्या पद्धतीने शक्य होईल, त्याचा विचार करून त्यातून मार्ग काढला जातो, असे निर्मिती संस्थांचे म्हणणे आहे.

मालिकांमध्ये काम करताना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, परंतु कलाकारांनी ते ज्या मालिकांमध्ये काम करत आहेत, त्याच मालिकेशी स्पर्धा करणाऱ्या मालिकेत काम करू नये, असा एक नियम आहे. इतर गोष्टींवर मात्र कलाकार निर्मात्यांबरोबर बोलूनच त्यावर मार्ग काढतात. कलाकारांची तारेवरची कसरत प्रेक्षकांनाही दिसते. सध्या आजारपणामुळे मालिकेतून काढून टाकल्याची तक्रार अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमातून केली आहे. मात्र अशा वेळी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो, असा निर्मिती संस्थांचा सूर आहे.

‘छत्रीवाली’ मालिकेचे निर्माते महेश तागडे म्हणाले, आमच्या सेटवर अनेकदा कलाकारांना आधी कल्पना न देता त्यांचे वाढदिवस साजरे के ले जातात. त्यांना पुरस्कार मिळाला तर त्यानिमित्तानेही त्यांचा सेटवर कौतुक सोहळा होतो. सेट म्हणजे कलाकारांचे दुसरे घर असते. त्यांना अधिकच्या सुटय़ा हव्या असतील, आजारपणामुळे किंवा अचानकपणे एखादी सुट्टी हवी असल्यास कलाकार आमच्याशी मोकळेपणाने बोलतात, मग त्यातून मधला मार्ग काढला जातो. ‘काहे दिया परदेस’ मालिका करत असताना आजीची भूमिका करणाऱ्या शुभांगी जोशी वयस्कर होत्या. त्यांना आजारपणामुळे चित्रीकरणाला यायला कधी कधी जमायचे नाही, तेव्हा त्यांच्या घरी जाऊन चित्रीकरण केले जायचे. तसेच आता सुरू असलेल्या ‘छत्रीवाली’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या कलाने घेत चित्रीकरण पूर्ण करतो आहोत. कारण दिवसभरात एका भागाचे चित्रीक रण पूर्ण करणे आवश्यक आहे.

मालिकेच्या पटकथेच्या मागणीनुसार कलाकारांच्या तारखा घेतल्या जातात. महिन्याला पाच सुटय़ा ठरलेल्या असतात. चित्रीकरणाच्या सकाळी ९ ते रात्री १० आणि संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ अशा दोन वेळा आहेत. त्यानुसार चित्रीकरण होते. मालिकांच्या विश्वात तशी कुठलीच मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. इथे विश्वासाने आणि प्रेमाने एकमेकांशी संवाद साधून अडथळे दूर केले जातात.

– प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी

आमच्या निर्मिती संस्थेत आतापर्यंत जेवढय़ा मालिका केल्या, त्यांचा अनुभव खूपच चांगला आहे. झी मराठी वाहिनी, कलाकार, तंत्रज्ञ यांनी आम्हाला छान पाठिंबा दिला आहे. आमच्याकडे एखादी समस्या उभी राहिली तर संवादातून मार्ग काढला जातो. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध कामगार संघटनांच्या नियमानुसार महिन्यातून दोन सुट्टय़ा असायला हव्यात; पण आम्ही पाच ते सहा सुट्टय़ा देतो.

– अपर्णा केतकर, राइट क्लिक मीडिया सोल्यूशन, तुला पाहते रे मालिका