बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. १८० कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी भन्साळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला कसून मेहनत करावी लागली. चित्रपटाच्या घोषणेपासून ते राजपूत समाजाच्या विरोधाला सामोरे गेले. कथानकावरून निर्माण झालेला असो, राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप असो, राजपूतांची प्रतिमा मलिन केल्याची टीका असो, भन्साळींनी सर्व गोष्टींचा सामना केला. प्रदर्शनावरून अजूनही देशभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे. मात्र, चित्रपट पाहिल्यावर त्यात वादग्रस्त असे काहीच नाही हे सहज लक्षात येते. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणांवरून हे रणकंदन सुरू आहे, असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही.

इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. तर याउलट ‘पद्मावत’मध्ये राजपूतांची गौरवगाथाच सांगण्यात आली आहे. सौंदर्यासोबत उत्त्म योद्धा आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेल्या महाराणी पद्मावतीच्या शौर्यगाथेचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. चित्रपटातील प्रत्येक दृष्यामध्ये दीपिका पदुकोण डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली आहे. मोजक्या संवादात चेहऱ्यावरील हावभावांनी लक्ष वेधणारी, नजरेनं कसदार अभिनय करणारी दीपिका कुठेच खटकत नाही. तरीही तिच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप का घेण्यात आला, हे कळत नाही.

अलाउद्दीन खिल्जीला आरशात अवघ्या काही सेकंदासाठी राणी पद्मावतीचा चेहरा दाखवला जातो. त्यानंतर संपूर्ण कथेत त्या दोघांचा कधीच सामना होत नाही. तरीही खिल्जी आणि राणी पद्मावतीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप का केला जात होता, हे कोडं उलगडत नाही. चित्रपटाच्या शेवटी महारावल रतन सिंह आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील तलवारबाजीचं दृश्य आहे. या युद्धात खिल्जी विश्वासघात करून महारावल रतन सिंह यांना मारतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यातही आक्षेपार्ह असे काही नाही. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरतात. तरीही चित्रपट न पाहताच करणी सेनेकडून तीव्र विरोध का होत आहे, हा प्रश्न अखेरपर्यंत पाठ सोडत नाही.