पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षानं घेतली आहे. काँग्रेसच्या मागणीवरच पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य अभिनेता विवेक ओबेरॉय व्यक्त झाला आहे, कदाचित काँग्रेस पक्षाला चौकीदाराच्या लाठीची भीती वाटत असेन असं विवेक म्हणला.

‘अभिषेक संघवी, कपिल सिब्बल यांच्यासारखे प्रतिष्ठित वकील या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करून वेळेचा अपव्यय का करत आहेत हेच मला समजत नाही. ते चित्रपटाला घाबरले की चौकीदाराच्या लाठीला हेच मला कळत नाही’, असं अभिनेता विवेक ओबेरॉय एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणला.

‘मोदींना  या चित्रपटात हिरो म्हणून अजिबात दाखवलं नाही. ते स्वत: हिरो आहेत. फक्त माझ्यासाठी नाही तर समस्त देशासाठी ते हिरो आहेत. म्हणूनच आम्ही त्यांची प्रेरणादायी कथा या चित्रपटात मांडली आहे.’,  असं विवेकनं स्पष्ट केलं आहे. विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत आहे. ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

काँग्रेससह अनेक पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. भाजप निवडणुकीत स्वत:च्या फायद्यासाठी या चित्रपटाचा वापर करत असल्याचा आरोप अनेकांचा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी आरपीआय (आय)चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी अ‍ॅड्. गणेश गुप्ता आणि तौसिफ शेख यांनी याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.