१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाने अभिनेत्री अनु अग्रवाल आणि अभिनेता राहुल रॉय यांच्यावर यश आणि प्रसिद्धीची बरसात केली असे म्हणायला हरकत नाही. महेश भट्ट दिग्दर्शित आशिकी या चित्रपटाने फक्त त्या काळच्याच नाही आजच्याही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेली राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मात्र दोघांचाही चेहरा जॅकेटने झाकलेला होता. यामागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

‘आशिकी’ची निर्मिती टी-सीरिजच्या गुलशन कुमार यांनी केली. गुलशन कुमार यांना यातील गाणी म्युझिक अल्बमद्वारे लाँच करायची होती. पण महेश भट्ट यांनी चित्रपट आणि गाणी हिट होणार असं आश्वासन दिलं तेव्हा ते निर्मिती करण्यास मान्य झाले. पण त्यानंतर त्यांनी राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्यावर आक्षेप घेतला. ‘चित्रपटातील हिरो आणि हिरोईन काही खास दिसत नाही. त्यामुळे हा चित्रपट हिट होईल का यावर मला शंका आहे,’ असं गुलशन कुमार महेश भट्ट यांना म्हणाले. भट्ट यांनी यावरही मार्ग काढला. ‘एक काम करूया, आपण पोस्टरवर त्यांचा चेहराच नको दाखवूया,’ असं ते म्हणाले.

वाचा : ‘आशिकी’च्या प्रदर्शनापूर्वी महेश भट्ट यांनी लिहून दिलं, ‘मी दिग्दर्शन सोडून देईन’

तेव्हा कुठे गुलशन कुमार ‘आशिकी’ प्रदर्शित करायला तयार झाले. केवळ इतकेच नाही तर मी हा चित्रपट नुसता प्रोड्यूस करणार नाही तर त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटींग करेल, असेही त्यांनी जाहीर करून टाकले.

‘आशिकी’च्या पोस्टरमध्ये दोघांचाही चेहरा जॅकेटने झाकलेला आहे. पण हा पोस्टरसुद्धा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.