फिटनेस आणि बोल्ड पर्सनालिटीसाठी खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. मात्र, या फिटनेसमुळे ओळखला जाणारा मिलिंद आणखी एका कारणासाठीदेखील ओळखला जातो. पर्यावरण आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मिलिंद कायमच आग्रही असतो. सोबतच तो अनेकदा पर्यावरण स्वच्छ ठेवण्याविषयी काही संदेशदेखील देताना दिसतो. अलिकडेच त्याने एक फोटो शेअर केला असून तीर्थक्षेत्री भाविक, पर्यटकांकडून होणाऱ्या कचऱ्यावर व्यक्त झाला आहे.

अलिकडेच मिलिंद, पत्नी अंकिता आणि आईसोबत जवळच असलेल्या शिव मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मात्र, या देवस्थळी जात असताना त्याला वाटेत बराच कचरा इतरत्र पसरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हा कचरा दिसल्यावर मिलिंदने तो स्वच्छ करत याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच देवस्थळाच्या प्रशासनाशीदेखील याविषयी चर्चा केली.


आज टेकडीवरच्या शिवमंदिरात गेलो होतो. सोबत अंकिता आणि आई उषादेखील होत्या. या मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गात हा असा कचरा आढळून आला. याविषयी मंदिराच्या प्रशासनाची चर्चा केली. मात्र, या टेकडीवर असलेली माकडं कचरापेटीतील कचरा इतरत्र पसरवतात, त्यामुळे इथे कचरा टाकण्यासाठी कोणतीही पेटी ठेवलेली नाही. तसंच हा कचरा नंतर जंगलात नेऊन जाळला जातो, असं प्रशासनाने सांगितल्याचं मिलिंदने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे तो म्हणतो, दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. त्यापैकी १. माकडांमुळे निर्माण होणारी ही समस्या लक्षात घेता आपल्याला आता थोडं सजग झालं पाहिजे. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांनी आता बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग करावं यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे. तसंच २. खाद्यपदार्थ कंपन्यांनी आता खऱ्या अर्थाने बायो-डिग्रेडेबल पॅकेजिंग केलं पाहिजे ज्यामुळे लोकांना खाद्यपदार्थदेखील खाता येतील.

आणखी वाचा- न्यूड फोटोमुळे मिलिंद विरोधात तक्रार, पतीचा नवा शर्टलेस फोटो शेअर करत अंकिता म्हणाली..

दरम्यान, मिलिंद सोमण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने वाढदिवसानिमित्त न्युड फोटो शेअर केला होता. ज्यावरुन सोशल मीडियावर बराच गदारोळ निर्माण झाला होता.