बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत तुफान सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालाय. डोंगरीसारख्या वस्तीतील एक गुंडगीरी करणारा तरुण ते देशात नाव लौकिक मिळवणार बॉक्सर अशा एका तरुणाची महत्वकांशा आणि त्याच्या जिद्दीची ही कथा आहे. या सिनेमात पुढे काय घडणार याचा अंदाज खरं तर अनेक ठिकाणी येतो. मात्र सिनेमाची गुंफण्यात आलेली कथा आणि कलाकांच्या अभिनयामुळे सिनेमा शेवटपर्यंत पाहणं औत्सुक्यात ठरतं.

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तुफान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. फरहान अख्तर हा एक उत्तम अभिनेता असून प्रत्येक भूमिकेसाठी तो मोठी मेहनत घेतो. त्याची हीच मेहनत तूफानमध्ये देखील दिसून आलीय. फरहानने त्याच्या शरीरावर आणि भाषेवर चांगलं काम केलंय. मुंबईतील टपोरी भाषा त्यांने चांगली पकडली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला अति आक्रमक आणि अंगावर येणाऱ्या अज्जूची भूमिका नंतर मात्र स्थिरावते. या सिनेमाची कथा अतिशय वेगळी आहे अशातला भाग नाही. याआधी देखील अनेक हॉलिवूड तसचं बॉलिवूड सिनेमांमध्ये बॉक्सरच्या आयुष्यावरील कथा पाहिली गेलीय.

मुंबईमधील डोंगरी भागात राहणार अज्जू हा वसूली करणारा गुंड आहे. मारझोड करणं, गुंडगिरी करत लोकांमध्ये दबदबा निर्माण करणं हे अज्जूचं (फरहान अख्तर) काम आहे. मात्र असं असलं तरी केवळ आपल्या स्वभावामुळे लोकांमध्ये आपली दहशत आहे, ते आपला आदर मुळीच करत नाहीत हे अज्जूला चांगलंच ठाऊक आहे. रागीट, सनकी असलेला अज्जू नाव कमावण्यासाठी मार्ग बदलण्याचा निर्णय घेतो आणि बॉक्सिंगच्या रिंगणात उतरतो. रस्त्यावर मारझोड करण्याऐवजी आता बॉक्सिंगच्या रिंगणात करावी याच एका विचाराने केवळ तो बॉक्सिंगडे वळतो. इथे मात्र अज्जूला काही नियम पाळत प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करायचे आहेत.

बॉस्किंगच्या रिंगणात उतरलेल्या अज्जूची भेट डॉक्टर असलेल्या अनन्याशी (मृणाल ठाकूर) होते. अनन्या आणि अज्जूमधील जवळीक वाढते. अज्जूला प्रोत्साहन देण्यासाठी मग अनन्याची धडपड, तिच्या एका डॉयलॉगने अज्जूमध्ये झालेलं परिवर्तन असा काहीसा टिपिकल ड्रामा इथं पाहायला मिळतो. अनन्याच्या प्रोस्ताहानानंतर अज्जूचा अखेर अजीज अली द बॉक्सर हा त्याचा प्रवास सिनेमात पाहायला मिळतो. मग या प्रवासात अज्जूच्या समोर उभी ठाकलेली संकटं, यावर तो कशी मात करतो, त्याला कुणाची साथ मिळते हे सिनेमातील अडीच तासात रंगवण्यात आलंय. सिनेमात मृणाल ठाकूरला फारशी स्क्रीन शेअर करायला मिळाली नसली तरी अज्जू आणि अन्नयाची केमिस्ट्री आणि अनन्याच्या वाट्याला आलेले डायलॉग छाप पाडून जातात.

या सिनेमात अनन्या ही फरहान अख्तरचे कोच नाना प्रभू (परेश रावल) यांची मुलगी आहे. सिनेमाच्या सुरुवातीपासून हे प्रेक्षकांना ठाऊक असलं. तर अज्जूला हे कळताच त्याच्या आयुष्यात आणखी एक वादळ येत. यातच परेश रावल यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकांप्रमाणेच या भूमिकेला देखील पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. हिंदू विचारसरणी असलेले नाना प्रभू एक विद्यार्थी म्हणून मुसलमान असलेल्या अजीजला कशा प्रकारे प्रोस्ताहन देतात हे सिनेमात पाहायला मिळतं.

‘तूफान’ सिनेमा पाहताना एक गोष्ट मात्र खटकू शकते ती म्हणजे ‘लव्ह जिहाद’चा देण्यात आलेला अँगल. एका खेळाडूची कहाणी असताना यात आंतरधर्मीय प्रेम कहाणीचा समावेश करत ‘लव्ह जिहाद’चा अँगल जबरदस्तीने प्रेक्षकांच्या माथी मारल्याचं जाणवंत. सिनेमातील हा मुद्दा वगळता सिनेमा मोठा असला तरी सिनेमातील बॉक्सिंगच्या दृश्यातील वास्तविकता, अज्जूची मुंबईमधील टपोरी भाषा शिवाय अज्जू आणि अन्नयाची लव्ह स्टोरी यामुळे सिनेमाची मजा वाढली आहे. सिनेमात फरहान अख्तर, परेश रावल आणि मृणार ठाकून यांच्या शिवाय हुसेन दलाल, सुप्रिया पाठक यांचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळतो.