अजय देवगन, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र रुपेरी पडद्यावर दिसले आहेत.  इंद्रकुमार दिग्दर्शित हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ‘टोटल धमाल’ने चार दिवसांत तिकिटबारीवर ७२.२५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांत ३६ कोटींची कमाई कराणाऱ्या टोटल धमालने रविवारी २५.५० कोटींची कमाई केली. तर सोमवारी ९.८५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. पहिल्याच आठवड्यात ९० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले आहे.

बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षाही सुरू होणार आहे. परीक्षांच्या काळात किंवा सुट्ट्या नसताना निर्माते चित्रपट प्रदर्शित करत नाही. परीक्षांच्या काळात अनेकदा चित्रपट व्यवसायास फटका बसतो असं निर्माते मानतात. त्यामुळे परीक्षांच्या काळात मोठे चित्रपट सहसा बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होत नाही मात्र टीम ‘टोटल धमाल’नं हाच काळ प्रदर्शनासाठी निवडला.

आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ८ कोटींहून अधिकची कमाई या चित्रपटानं केली आहे. ‘टोटल धमाल’ चित्रपटासमोर रणवीर आलियाच्या ‘गली बॉय’चं आव्हान असणार आहे. गली बॉयनं आतापर्यंत १११.२५ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.