चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: स्थान निर्माण केलेला प्रत्येक कलाकार त्याच्या विशिष्ट भूमिकेसाठी ओळखला जातो. मात्र ज्यावेळी हेच कलाकार वेगळ्या धाटणीची भूमिका साकारतात त्यावेळी उपस्थित साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या जातात. अशाच ‘ट्रकभर स्वप्न’ या आशयघन चित्रपटामध्ये क्रांती रेडकर आणि मकरंद देशपांडे हे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. या चित्रपटामध्ये मकरंद-क्रांती प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या मकरंदने आतापर्यंत मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र या चित्रपटात तो वेगळ्या अंदाज दिसणार आहे.

दरम्यान, या चित्रपटात मकरंदने टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे. सर्वसामान्यांची स्वप्न फार मोठी नसतात. आपलं एक घर असावं, मुलं आणि पत्नीसोबत सुखाचे चार क्षण घालवावे, आठवड्याच्या एखाद्या संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारावा आणि सुखाने जीवन जगावं ही सर्वसामान्यांचं स्वप्न. याच स्वप्नांच्या दुनियेत मकरंद आणि क्रांती रमल्याचे ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.